Coronavirus: कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल, बार मालकांना भरावा लागणार १० हजार दंड; KDMC चा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 10:07 PM2021-07-14T22:07:06+5:302021-07-14T22:07:17+5:30
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार दंड लागू केला जाणार आहे
कल्याण - कोरोनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका अविरतपणे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे असतानाही महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये (उदा. दुकाने/ हॉटेल्स/ उपाहारगृहे /फुड कोर्ट/ मद्यालये इ.)सामाजिक अंतर राखले जात नसल्याची त्याचप्रमाणे तेथे उपस्थित असलेले ग्राहक, कर्मचारी, व्यवस्थापक तोंडावर मास्क परिधान करत नसल्याचा प्रकार समोर आला.
विहित वेळेची मर्यादा न पाळता काल मर्यादेचे उल्लंघन करत असल्याची बाब वारंवार निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार दंड लागू केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या दुकानांमध्ये अथवा हॉटेल्स, फूड कोर्ट उपाहारगृहे मद्यालये इ. ठिकाणी आत किंवा बाहेर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिक हे यापुढे द्रव्यदंडास पात्र ठरणार आहेत.
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार दंड लागू केला जाणार आहे. अन्य आस्थापनांनी पहिल्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना ५ हजार रुपये दंड लागू केला जाणार आहे. दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट २० हजार रुपये दंडास पात्र असणार आहेत तर अन्य आस्थापनांनी दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार रुपये दंड लागू होणार आहे. आणि तिसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत सदर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, दुकाने / आस्थापना सील करण्यात येईल असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.