अजून किती काळ कामगारांचे जळालेले तुकडे गोळा करणार? कामगार भेदरले, नागरिक संतापले
By अनिकेत घमंडी | Published: June 13, 2024 01:53 PM2024-06-13T13:53:16+5:302024-06-13T13:53:34+5:30
Dombivali MIDC News: जगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - रोजगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एमआयडीसीतील कंपन्यांना किती केमिकल साठा करण्याची परवानगी आहे? त्यांनी किती साठा करून ठेवलाय यावर कुणाचेच नियंत्रण नाही का, असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.
वीस दिवसांपूर्वी अंबर(अमुदान) कंपनीत स्फोट झाला. आता इंडो अमाईनमध्ये आग लागली हे आणखी किती दिवस चालणार? यावर काही तोडगा आहे की नाही? सगळा अनागोंदी कारभार असाच सुरू राहणार? हे कारखानदार पैसेवाले आहेत त्यामुळे त्यांना लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल जमलेल्या नागरिकांनी केला. अमुदान स्फोटात ज्यांच्या घरांचे खूप नुकसान झाले, त्यापैकी काही महिलांना बुधवारी रडू कोसळले.
पुन्हा स्थिती जैसे थे
राजकीय पक्ष, शासन काही करत नाही, फक्त अपघात झाला की येतात आणि घोषणा करून जातात, पुन्हा स्थिती जैसे थे. शासकीय यंत्रणाही एकामागून एक येतात. सामान्यांच्या जीवाचे कोणाला काही पडलेले नाही, ही शोकांतिका आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नोकरी करणे झाले कठीण
कामगार रोजीरोटीसाठी येतात आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. आगीचे लोळ, धूर दिसल्याने इंडो अमाईनमधील कामगार निदान बाहेर पळाले.
बॉयलर किंवा रिॲक्टरचा स्फोट झाला तर आतल्या आत किती गेले त्याचा पत्ता लागत नाही. नंतर जळलेले मांसाचे तुकडे गोळा केले जातात, अशी भावना एका कामगाराने व्यक्त केली. येथे नोकरी करणे कठीण झाल्याची खंत त्याने व्यक्त केली.