कोपर उड्डाणपुलाच्या कामात किती जागा जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:48 AM2021-01-14T00:48:51+5:302021-01-14T00:49:00+5:30

केडीएमसीने स्पष्ट करावे : माजी नगरसेवक, रहिवाशांचे साखळी उपोषण

How much space will be spent on the Kopar flyover? | कोपर उड्डाणपुलाच्या कामात किती जागा जाणार?

कोपर उड्डाणपुलाच्या कामात किती जागा जाणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डाेंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू असून, त्या कामात पुलालगतच्या रहिवाशांची जागा बाधित होणार आहे. मात्र, नेमकी किती जाणार, याचे स्पष्टीकरण केडीएमसीचा एकही अधिकारी देत नाही. त्यामुळे त्याविरोधात माजी नगरसेवक मंदार हळबे हे परिसरातील रहिवाशांसमवेत साखळी उपोषणाला बसले आहेत.
यासंदर्भात हळबे म्हणाले की, ‘उड्डाणपुलाच्या कामाला अजिबात विरोध नाही. या पुलाचे काम पत्रीपुलाप्रमाणे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे पुलासाठी तयार होणाऱ्या रस्त्यासाठी तेथील रहिवाशांची जागा बाधित आहे. याबाबत संबंधित ४८ जणांना मनपाने नोटीस दिली आहे. त्याबाबत सुनावणी झाली होती. मात्र, नेमकी कोणाची कोणत्या दिशेकडील किती जागा जाणार आहे, त्या जागेच्या मोबदल्यात ज्यांची घरे जातील, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘मनपाचे पथक मंगळवारी सनशाईन इमारतीचे कंपाउंड तोडण्याच्या तयारीत आले होते. त्यामुळे रहिवाशांमध्ये दडपणाचे वातावरण आहे. ते सहन केले जाणार नाही. मनपाने बाधित जागेच्या बदल्यात काय भरपाई देणार हे जाहीर करावे. त्यानंतर कामाला सुरुवात करावी. आम्ही नेहमीच मनपाला सहकार्य करत आलो आहोत. मध्यरात्रीही १२ ते ६ या वेळेत काम करण्यासाठी रहिवासी एकत्र येऊन सहमती दिली होती, म्हणून जे काम आता दिसते आहे, ते झाले आहे, अन्यथा पुलाच्या कामाला आणखी दिरंगाई झाली असती.’
दरम्यान, हळबे यांनी आंदोलन करू नये, कोरोनाकाळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, ते गरजेचे असल्याचे कारण दाखवत बुधवारी त्यांना नोटीस बजावली होती; पण जनतेसाठी कोरोनाच्या नियमांची काळजी घेऊन साखळी उपोषण केले जाईल, असे उत्तर त्यांनी त्यावर दिले होते. दुपारी चार वाजेपर्यंत उपोषणकर्त्यांशी चर्चा करायला कोणीही आले नसल्याचे हळबे म्हणाले.

कोपर उड्डाणपुलाच्या कामामुळे कोणीही बेघर झालेले नाही. तेथील रहिवाशांना दिलेल्या नोटिशीनुसार त्यांची १८ डिसेंबरला सुनावणी घेतली होती. त्याला मंदार हळबे राहात असलेल्या सोसायटीचे सचिव उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पुलाच्या कामासाठी पूर्ण सहकार्य असेल, असे जाहीर केले होते. तसेच तेथील एका हॉटेलचे संचालक नितीन पाटील यांनाही पुलाच्या कामात अडथळा येणारी भिंत तोडण्यासंदर्भात सूचित केले होते, त्यांनी त्याप्रमाणे समान हलवून सहकार्य केले.     - स्नेहा करपे, ग प्रभागक्षेत्र अधिकारी
 

Web Title: How much space will be spent on the Kopar flyover?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.