पालिकेने बिले थकवल्याने कंत्राटी कामगारांचा पीएफ कसा भरायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:22 AM2021-01-09T01:22:44+5:302021-01-09T01:22:54+5:30
महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे हप्ते २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेले नाही. त्यामुळे पीएफ ठाणे कार्यालयाने पालिकेस नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कंत्राटदारांची बिले जुलै महिन्यापासून थकली आहेत. बिले थकल्याने आपल्याकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या पीएफ कसा भरायचा, असा सवाल कंत्राटदारांनी केला आहे. कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले थकली आहेत.
महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे हप्ते २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेले नाही. त्यामुळे पीएफ ठाणे कार्यालयाने पालिकेस नोटीस बजावली आहे. पीएफची ११० कोटींची थकीत रक्कम कंत्राटदार भरत नसतील, तर पालिकेकडून ती वसूल करण्यात यावी, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना काळात महापालिकेचा सगळा खर्च हा कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यावर झाला आहे. अशा परिस्थितीत पीएफ कार्यालयाने नोटीस पाठविल्याने महापालिकेने जुना रेकॉर्ड काढून कंत्राटदारांना पीएफ थकविल्याप्रकरणी नोटिसा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोविड काळात कोणत्याही थकीत रकमेची वसुली सक्तीने करण्यास मनाई आहे. त्यानुसार महापालिका पीएफ लवादाकडे दाद मागण्यासाठी गेली आहे. लवादाने ८ जानेवारीपर्यंत सक्तीच्या वसुलीस स्थगिती दिली होती. लवादापुढील अर्जाला पुढील सुनावणीची तारीख मिळाली आहे. कंत्राटदारांना त्यांची बिले वेळेत मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे पीएफचे पैसे कुठून भरणार, असा प्रश्न कंत्राटदार करीत आहेत.
विक्रमी करवसुली काय कामाची?
दिवाळीत महापालिका आयुक्तांनी केवळ २५ टक्के थकीत बिलाची रक्कम देण्याची तजवीज केली होती. सध्या महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. तिला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यातून महापालिकेस ३१ डिसेंबरअखेर २०४ कोटी रुपये करवसुली झाली आहे.
७ जानेवारीपर्यंत अभय योजनेची रक्कम मिळून ३४० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या वसुलीपोटी जमा झाले आहेत. एकीकडे कोरोना काळात विक्रमी करवसुली सुरू असताना कंत्राटदारांची बिले थकविली जात आहेत, यावर कंत्राटदारांनी आक्षेप घेतला आहे. बिले दिली, तर कामगारांचा पीएफ भरणे शक्य होईल, असे काही कंत्राटदारांनी सांगितले.