हुश्श... ठाकुर्लीतील रस्ता वाहतुकीसाठी झाला खुला ! पेव्हरब्लॉक टाकण्याचे काम पूर्ण
By प्रशांत माने | Published: November 6, 2023 05:37 PM2023-11-06T17:37:35+5:302023-11-06T17:46:18+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्यायी रस्ता म्हणून ठाकुर्ली येथील जुने हनुमान मंदिर ते रामभाऊ चौधरी चौक हा रस्ता ओळखला जातो.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्यायी रस्ता म्हणून ठाकुर्ली येथील जुने हनुमान मंदिर ते रामभाऊ चौधरी चौक हा रस्ता ओळखला जातो. हा रस्ता पेव्हरब्लॉकच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर काम पूर्ण झाल्याने रविवारी हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. हा रस्ता खुला झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून वाहतूक सुरू झाल्याने इतर मार्गांवर वाढलेली वाहतूक काहीअंशी का होईना कमी होऊन तिथली कोंडीची समस्या टळणार आहे.
कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा मार्ग असल्याने या रस्त्यावरून सकाळ-संध्याकाळ मोठया प्रमाणात वाहतूक होते. दरम्यान या रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने वाहनांची गती कमी होऊन वाहतूककोंडीची समस्या देखील वारंवार उदभवत होती. यंदाच्या पावसाळयातही मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. वारंवार खड्डयांची समस्या उदभवत असल्याने हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. परंतू तातडीचा उपाय म्हणून पेव्हरब्लॉक टाकण्याचा निर्णय चोळेगाव ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने घेण्यात आला होता.
पेव्हरब्लॉक टाकण्याच्या कामासाठी २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत रस्ता वाहतूकीसाठी बंद राहील अशी अधिसूचना डोंबिवली वाहतूक शाखेच्या वतीने जाहीर केली गेली होती. दरम्यान तत्पुर्वीच काम पूर्ण झाल्याने ५ तारखेला रविवारी हा रस्ता वाहतूकीसाठी खुला केला गेला. नुकतेच टिळकनगर पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून नियुक्त झालेले आणि आधी डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक म्हणून राहीलेले उमेश गित्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रस्ता वाहतूकीसाठी खुला झाला. यावेळी चोळेगावचे ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.