मीही भाजपची कार्यकर्ती, माझ्यावर अन्याय का? विनयभंग प्रकरणी पीडितेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 09:11 AM2023-06-13T09:11:37+5:302023-06-13T09:11:50+5:30
न्यायासाठी महिलेचे मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर उपोषण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही नंदू जोशी यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष उभा आहे. मीपण भाजपची कार्यकर्ती आहे. मग पक्ष मला न्याय का देत नाही? पंतप्रधान, उपमुख्यमंत्री व महिला आयोग मला न्याय देणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेने केला आहे. न्यायासाठी संबंधित महिलेने मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर उपोषण सुरू केले आहे.
भाजपचे डोंबिवलीतील पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, बागडे यांची बदली करु नये. त्यांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असून, मला न्याय देण्याचा प्रयत्न महिलेने म्हटले आहे.