गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही
By मुरलीधर भवार | Published: June 18, 2024 06:39 PM2024-06-18T18:39:40+5:302024-06-18T18:40:40+5:30
केडीएमसीने घेतली मूर्तीकारांची बैठक
कल्याण- कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत मूर्ती बनविणे आणि विक्री करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेले कारागीर मूर्तिकार आणि उत्पादक यांना मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी देण्यात येणार नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली आहे, त्यासाठी कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिरात मूर्तीकार, मूर्ती विक्रेते, गणेश मूर्ती कारखानदार यांची एक बैठक बोलाविली होती. यावेळी उपायुक्त पाटील यांनी उपरोक्त आवाहन केले. मूर्तिकारांना त्यांनी केवळ पर्यावरण पूरक- मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री करावी अशा सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेल्या जागेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार केवळ पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना आवश्यक पुरेशी शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल. मूर्तीकारांनी पर्यावरण पूरक शाडूच्याच मूर्ती तयार कराव्यात असे आवाहन उपायुक्त अतुल पाटील यांनी मूर्तीकारांना केले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी , मनूसृष्टी पर्यावरण कन्सल्टन्सीच्या वैशाली तांबट यांनी पीओपीच्या मूर्तीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानी आणि जल प्रदूषणाबाबतची माहिती दिली.