समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते
By मुरलीधर भवार | Published: December 14, 2022 08:31 PM2022-12-14T20:31:20+5:302022-12-14T20:32:37+5:30
आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती.
डोंबिवली: समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकांमधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.
आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अनिता दाते-केळकर प्रेक्षकांशी संवाद साधताना बोलत होत्या. संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकलाकार साईशा भोईर या देखील उपस्थित होत्या.
अनिता म्हणाल्या, समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावावे हे सांगावे लागते. वास्ताविक ही गोष्ट स्वाभाविकपणो घडली पाहिजे. पण वर्षानुवर्ष स्त्रियांनीच ही कामे करावी ही जबाबदारी त्यांच्यावर लादली गेली आहे. स्त्रिया यातून भरडल्या जात आहेत. एकीकडे स्त्रियांना देवीचा रूप मानले जाते. दुसरीकडे तिला कमी लेखले जाते असा दुटप्पी पध्दतीचा समाज आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर स्त्रियांनी आपल्या मुलाला अधिक वेगळ्य़ा पध्दतीने घडविले पाहिजे. स्त्रियांचा सन्मान करायला शिकविले पाहिजे. मुला-मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. त्यामुळे थोडाफार बदल घडेल. परिस्थिती बदलली आहे असे आपण म्हणतो पण घराघरात अजून ही परिस्थिती तशीच आहे. समाज बदलायला अजून ही खूप वेळ लागणार आहे. समाज बदलेल तेव्हाच मालिकेतून सोशिक स्त्री दाखविणो बंद होईल. मालिकामधील स्त्री अजून ही लढत आहे. आणि इतर स्त्रियांना लढण्यासाठी प्रेरणा देत आहे. समाजात अनेक स्त्रिया अश्या आहेत त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी काहीतरी काम करायचे आहे. पण तिला घरातून साथ मिळत नाही. मालिका पाहून प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले तर समाजात बदल नक्कीच घडतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.