सात लाखांचा दंड तर, या गाडया चालविणार कोण?, हिट अँड रन कायदयाला रिक्षाचालकांचाही विरोध
By प्रशांत माने | Published: January 4, 2024 06:06 PM2024-01-04T18:06:25+5:302024-01-04T18:06:37+5:30
कल्याण : इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई यातं टेम्पो, ट्रक, रिक्षा, टॅक्सीचालक मेटाकुटीला आला असताना केंद्र सरकारने हिट अँड रन ...
कल्याण: इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई यातं टेम्पो, ट्रक, रिक्षा, टॅक्सीचालक मेटाकुटीला आला असताना केंद्र सरकारने हिट अँड रन हा आणलेला कायदा एकतर्फी आहे. कुठलाही चालक हा स्वत:हून अपघात करणार आहे का? त्यांना स्वत:ची व आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी नाही का? याकडे लक्ष वेधत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेना या संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले. अपघात झाल्यास सात लाख दंड आकारण्यात येणार असेल तर गाडया चालविणार कोण? असा सवाल संघटनेने केला आहे.
केंद्र सरकारचा कायदा एकतर्फी आहे. देशात असलेली लोकसंख्या, रस्त्याची परिस्थिती यावर विचार न करता गाडी चालकांवर अपघाताची जबाबदारी टाकून स्वत: नामनिराळे होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहा वर्षे कैद आणि सात लाख रूपयांचा दंड असा अमानवी नियम विदेशात ही नाही, रविवारपर्यंत हा काळा कायदा मागे न घेतल्यास सोमवारपासून चक्का जाम आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे. प्रांत अधिकारी गुजर यांच्याबरोबर कल्याण आरटीओ विनोद साळवी यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे रमेश जाधव, निलेश भोर, बबलु खान, फकीरा मुलानी, इस्माईल पठाण, इस्माईल पंजाबी, सिकंदर शेख, फईम चौधरी, खमर शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.