2 दिवसात रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर धूळ तुमच्या चेहऱ्याला फासू, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: October 6, 2023 04:56 PM2023-10-06T16:56:33+5:302023-10-06T16:58:29+5:30
शहरातील स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यात यावी असे देखील बजावले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील ठाकूर्ली रस्त्याची पाहणी आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी रस्त्यावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजविले गेले नाही तर रस्त्यावरील धूळ अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासू असा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यात यावी असे देखील बजावले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह सचिव संतोष चव्हाण, विजय देशमुख,कौस्तुभ फडके, सुनील भोसले, सुनील मालणकर यांनी आज ठाकूर्ली परिसरातील रस्त्याची पाहणी केली. या वेळी महापालिकेचे शहर अभियंते अर्जून अहिरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. पावसाने उसंत घेतली आहे तरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. रस्त्यात खड्डे पडले तेथील रस्त्यांची दुरुस्ती करुन रस्ते पूर्ववत करण्याबाबत आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. गेले चार दिवस रस्ते दुरुस्तीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. या कामात महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच जे काम सुरु आहे. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, हीच बाब काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना सांगितली असता खासदार शिंदे यांनी महापालिका शहर अभियंता ह्यांचे सोबत पाहणी करण्यास सांगितले.
आजच्या पाहणी दौऱ्यात महापालिका अभियंते रस्ते डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का हा प्रश्न उपस्थित केला, तसेच जे महत्त्वाचे आणि वाहतुकीसाठी वर्दळीचे रस्ते तातडीने का दुरुस्त का झाले नाहीत , असे विचारले असता महापालिका अधिकारी निरुत्तर होते. ठाकुर्ली पूल ते मंजुनाथ आणि नेहरु रस्ता ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती दाखविली. ह्याचा राग येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोशी हायस्कूल येथील भर चौकातील रस्त्यावरच ह्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जर दोन दिवसात वाहतुकीचे प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे झाली नाही तर अधिकाऱ््यांच्या रस्त्यावरील धूळ फासू असा इशारा देण्यात आला, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्वरीत द्यावेत अशी मागणी केली आहे.