पिण्यासाठी पाणी येत नाही तर अंघाेळ कुठून करणार
By मुरलीधर भवार | Published: May 13, 2023 05:59 PM2023-05-13T17:59:39+5:302023-05-13T17:59:51+5:30
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावात नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज रास्ता रोको आंदोलन करुन ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावात नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज रास्ता रोको आंदोलन करुन महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
२७ गावांकरीता अमृत पाणी पुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी टाकण्यास एका व्यक्तिने विरोध केला आहे. कारण ही जलवाहिनी त्याच्या जागेतून जात आहे.
त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. तसेच कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी गावातील पाणी समस्या साेडविण्याकरीता महापलिकेच्या निधीतून ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे. या पंपाला विजेचे कनेक्शन देणे बाकी आहे. कनेक्शन लागताच पाण्याची समस्या दूर हाेणार आहे. मात्र काही मंडळी आडकाठी करीत असल्याने हे काम हाेत नाही. याकडे संतप्त नागरीकांनी लक्ष वेधले आहे. एका आजीबाईचे घर माेडकळीस आल्याने तिने माणेरे गावात भाड्याने खाेली घेतली. मात्र घरात पाणीच येत नसल्याने तिला दरराेज भर उन्हात उल्हासनगरातून पाणी आणावे लागते. त्यामुळे तिची उतारवयात पाण्यासाठी तंगडताेड हाेत आहे. या भागातील वंसत भाेईर यांनी सांगितले की, मुख्य जलवाहिनीवरुन बेकायदा नळ जाेडण्या बेकायदा बांधकामांना दिल्या आहेत. त्यामुळे गावातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही महिलांनी सांगितले की, घरात पिण्यासाठी पाणी नसते. तर अंघाेळ कुठून करणार. या समस्येविषयी महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन पाठपुरावा केला तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. राेज एक ड्रम पाण्यासाठी ५० ते १०० रुपये माेजावे लागतात. या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या नागरीकांनी आज माणेरे गावातील मुख्य रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करुन प्रशासनाचा जाहिर निषेध केला.
यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी नागरीकांची भेट घेतली. नागरीकांची मागणी रास्त आहे. खासदारांनी कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तरी देखील काम हाेत नसल्यास अधिकारी वर्गाच्या विराेधात कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.