"राज ठाकरे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते; आम्ही चुकलो असतो तर माफी मागितली असती"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:40 PM2021-02-01T21:40:55+5:302021-02-01T21:41:14+5:30
मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया
कल्याण- मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रवेशानंतर कदम यांनी त्यांच्या फेसबूकवर मला माफ करा अशी भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर ते चुकले म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. आम्ही चुकलो असतो तर आम्ही माफी मागितली असती, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कदम यांच्या प्रवेशानंतर मनसे आमदार राजू पाटील यांच्या पलावा येथील कार्यालयात मनसेचे शेकडो कार्यकर्ते सायंकाळी जमले. त्यांच्यासोबत राजू पाटील यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीपश्चात पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेत जाणाऱ्यांची काही मजबूरी असेल. इतर काही आमिषांना ते बळी पडले असतील. ही दुदैवी गोष्ट आहे. त्यांचे घरगूती प्रश्नही त्याला जबाबदार असू शकतात, असंही राजू पाटील यांनी सांगितले.
डोंबिवली विभागीय मनसे पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/cqMK8QV7GI
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2021
राजू पाटील पुढे म्हणाले की, राज ठाकरेंवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांच्या जाण्याचे नेमके कारण आम्हाला माहिती नाही. तरी देखील कारण आम्ही शोधून काढू. निवडणूका आल्या की, साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करुन आपल्या पदरात काही पक्षातील लोक पाडून घ्यायचे त्याचा हा पक्ष प्रवेश असेल, अशी टीकाही राजू पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर केली आहे.
कोरोना काळात कल्याण लोकसभा मतदार संघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता सामान्यांसाठी काम केले. शिवसेना भाजपाची युती तुटलेली आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन खचली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षातील काही कार्यकर्ते फोडून जमवाजमव केली असेल. मला नाही वाटत आगामी काळात त्याचा आम्हाला काही फरक पडेल. जे व्हायचे ते होणारच,असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे.