आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! मनसेने झळकविला बॅनर
By प्रशांत माने | Published: March 28, 2023 04:57 PM2023-03-28T16:57:48+5:302023-03-28T16:58:09+5:30
प्रभागांतर्गत बदल्यांनतरहीफेरीवाला अतिक्रमण जैसे थे
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली परंतू फेरीवाला अतिक्रमण जैसे थे राहीले आहे. हे चित्र पाहता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्थानक परिसरात बॅनर झळकावून फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! असा इशारा केडीएमसीला दिला आहे. त्यामुळे फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनसेकडून खळखटयाक होण्याची चिन्हे आहेत.
इतर शहरांप्रमाणो फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा नेहमीच कल्याण डोंबिवली शहरांसाठी कळीचा मुद्दा राहीला आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव आहे. पण केडीएमसी प्रशासनाला त्या आदेशाच्या अंमलबजावणीचा विसर पडला आहे. कल्याण असो अथवा डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसराला बकालावस्था आली असून, पदपथ आणि रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात हरवले आहेत. दरम्यान डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण पाहता १३ मार्चला मनसेचे आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत कारवाई संदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन पाटील यांना दिले होते. पंधरा दिवसात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. दरम्यान १५ दिवसानंतरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण स्थानक परिसरात जैसे थे राहील्याने डोंबिवली स्थानक पूर्व परिसर फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा असा बॅनर स्थानक परिसरात झळकावून मनसेने एकप्रकारे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.
आमदार पाटील यांनी भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी फेरीवाला विरोधी पथकांमधील कर्मचा-यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या होत्या. याउपरही अतिक्रमण जैसे थे राहीले असून एका रुग्णवाहिका चालकाला गाडीचा धक्का लागला म्हणून फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना देखील नुकतीच घडली होती. फेरीवाला अतिक्रमणासह त्यांच्या पुर्नवसनाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थिती ओढावली असून पुन्हा एकदा फेरीवाला कारवाईवरून मनसे रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता आहे.
एकिकडे फेरीवाला कारवाईच्या मुद्यावरून प्रशासनावर तोंडसुख घेतले जात असताना दुसरीकडे राजकीय दबावापोटी काही ठिकाणी कारवाईला मर्यादा येत असल्याचीही चर्चा आहे. कारवाई करणा-या कर्मचा-याला दूरध्वनी करून तुम्हाला आमचीच माणसे दिसतात का? असे फोनही काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांकडून केले जात आहेत. त्यामुळे दबावात काम कसे करायचे? असा प्रश्नही फेरीवाला विरोधी पथकातील कर्मचा-यांना पडला आहे.