अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील
By प्रशांत माने | Published: November 30, 2022 06:28 PM2022-11-30T18:28:13+5:302022-11-30T18:28:27+5:30
बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत.
कल्याण: शहरात साधी झोपडी उभी राहीली तर तत्काळ कारवाई होते परंतू बेकायदेशीरपणे टोलेजंग इमारती बिनदिककतपणे उभ्या राहतात अधिका-यांच्या आशिर्वादाशिवाय अशी कामे होऊच शकत नाहीत असा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी केला. पाटील त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खोळंबलेल्या विकासकामांबाबत आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी महारेरा फसवणूकीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनपा अधिका-यांना लक्ष केले.
बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी केल्या आहेत. २७ गावांमध्ये कोणतेही धोरण नव्हते. आरक्षणामुळे स्थानिक भूमिपुत्रांना जागाच राहीली नव्हती. ज्या भूमिपुत्रांनी बांधकाम केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांची बांधकामेही तोडली पण ती उभी राहताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर काय कारवाई झाली असा सवाल पाटील यांनी केला. तसेच अशा बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई होण्यासाठी देखील महारेरा फसणूक प्रकरण उघडकीस आणणा-या संदीप पाटील यांनी लढावे असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.
रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळावा
कल्याण ग्रामीणमधील रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे जेणोकरून रिंगरूटच्या कामांना गती येईल. पलावा येथील मालमत्ता करातही सवलत मिळाली पाहिजे. तसेच पाणी प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याचे आमदार पाटील म्हणाले. कल्याण डोंबिवलीत चालू असलेल्या कामांचा दर्जा हा निष्कृष्ठ आहे. स्मार्ट सिटी ही फक्त कल्याणसाठी आहे डोंबिवलीतील एका सिग्नलला चार सिग्नल लावले आहेत. डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीत समावेश न केल्याबाबत ही आम्ही वारंवार आवाज उठविले आहेत. परंतू कल्याणमध्ये चालू असलेल्या कामांवर लक्ष देणे गरजेचे आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस तातडीने होण्याबरोबरच तेथील वाहतूक कोंडीवर लवकरात तोडगा निघायला पाहिजे याकडेही पाटील यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.