'रेरा'नंतरही डोंबिवलीत बेकायदा बांधकामे सुरुच, उपोषणाचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: December 29, 2022 03:49 PM2022-12-29T15:49:30+5:302022-12-29T15:50:08+5:30
माजी स्थायी समिती सभापतीच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाई करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा
कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत रेरा आणि महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी एसआयटी आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. रेरा प्रकरणानंतरही डोंबिवली पश्चिमेत बहुमजली इमारत बांधली जात आहे. या प्रकरणी स्थायी समितीचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी तक्रारीची दखल घेतली जात नाही. बेकायदा इमारतीवर कारवाई केली गेली नाही तर प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
माजी सभापती म्हात्रे यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेतील त्यांच्या प्रभागात एका व्यक्तीने बेकायदा गोडाऊन तयार करुन त्यात गाळे उभारले आहेत. तसेच अन्य ठिकाणी बेकायदा इमारतीचे पाच मजली बांधकाम केले आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली होती. गोडाऊनच्या काळ्य़ावर यापूर्वीचे प्रभाग अधिकारी अक्षय गुडदे यांनी कारवाई केली होती. त्यानंतर आलेल्या प्रभाग अधिका:यांनी त्याकडे दुर्लल केले. थातूरमातूर कारवाई करुन केवळ कारवाई केल्याचा फार्स केला जातो. बेकायदा इमारतीच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रभाग अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामे बेकायदा असल्याने संबंधित बांधकामधारकास नोटिसा बजावल्या आहेत. मात्र पूढे काही एक कारवाई केली जात नाही. बेकायदा बांधकामासंदर्भात स्थानिक नागरीकांनीही म्हात्रे यांच्याकडे तक्रारी केल्या आहे.
या बेकायदा बांधकामात घरे घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाकडे कारवाईकरीता पाठपुरावा केला जात आहे. मात्र प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. रेरा प्रकरणानंतरही प्रशासनाने काही एक धडा घेतलेला दिसत नाही याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार संबंधित बेकायदा बांधकामाच्या विरोधात कारवाई केली आहे.