मिलापनगर तलावात अवैध्य मासेमारी

By अनिकेत घमंडी | Published: June 25, 2024 11:55 AM2024-06-25T11:55:29+5:302024-06-25T11:55:51+5:30

भविष्यात एखादी दुर्घटना होऊ शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. 

Illegal fishing in Milapnagar lake | मिलापनगर तलावात अवैध्य मासेमारी

मिलापनगर तलावात अवैध्य मासेमारी

डोंबिवली: एमआयडीसी निवासी मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव मध्ये गेल्या काही दिवसांपासून गळ टाकून मासेमारी करण्यासाठी काही नागरिक येत असून त्यात अल्पवयीन मुले पण मासेमारी करत असल्याचे परिसरातील रहिवाश्यांनी सांगितले. पावसाळा सुरू असून तेथे भरपूर पाणी जमा होते, त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना होऊ शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. 

त्या तलावात लहान/मोठे अनेक जातींचे मासे असून कासव पण भरपूर आहेत. काही वर्षांपूर्वी याच तलावात अनेकदा मासे मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत दिसल्याने स्थानिक रहिवासी संघटनांनी तक्रारी केल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी त्याची काही प्रमाणात दखल घेतली होती. निर्माल्य/कचरा आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठ्या मूर्तींचे विसर्जन यामुळे तलावाचे पाणी खराब झाल्याने त्यात पाण्यातील ऑक्सीजन प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्युमुखी पडत होते. ही बाब तलावातील पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली असता माहिती पडली. येथील स्थानिक रहिवाशी संघटना डोंबिवली वेलफेअर असोसिएशन आणि मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांनी  तलाव वाचविण्यासाठी  राष्ट्रीय हरित लवाद, पुणे यांच्याकडे २०१६ मध्ये याचिका केली असता त्यांनी त्या तलावातील मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. आणि तलाव मधील गाळ आणि साफसफाई वेळच्यावेळी महापालीकेने करावी असा आदेश दिले होता. तेव्हापासून येथील मूर्ती विसर्जन बंद असून मात्र तलावाची साफसफाई वेळच्यावेळी होत नसल्याचे सांगण्यात आले. काही बेजबाबदार नागरिक या तलावात निर्माल्य फेकून तलाव खराब करीत असतात.

त्या तलावातील ही अवैध्य मासेमारी बंद करण्यात यावी. तलावाची साफसफाई वेळच्यावेळी करण्यात यावी. तलाव वाचवा ! पर्यावरण वाचवा !! अशी मागणी रहिवासी संघटना करीत आहेत.

Web Title: Illegal fishing in Milapnagar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.