टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By प्रशांत माने | Published: May 9, 2024 08:40 PM2024-05-09T20:40:42+5:302024-05-09T20:41:09+5:30
याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे.
डोंबिवली : बेकायदा मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली विभागाने बुधवारी कारवाई करीत १८८ बल्क लिटर विदेशी दारू आणि बिअर असा एकूण चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाच्या पथकाला पूर्वेकडील निळजे, लोढा हेवन कासारिओ रोड याठिकाणी एका टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, सागर धिडसे, रंजीत आडेे, एच. एम. देवकते, अमृता नगरकर आदींच्या पथकाने सापळा रचून टेम्पोवर कारवाई केली.
ड्राय डेच्या दिवशी कारवाई
पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात १ मे ड्राय डे च्या दिवशी एक महिला देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा लावत पथकाने मैनाबाई भोईर या महिलेला अटक केल्याची माहिती दुयम निरीक्षक निकाळजे यांनी दिली.