तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी
By अनिकेत घमंडी | Published: July 6, 2023 03:21 PM2023-07-06T15:21:59+5:302023-07-06T15:23:39+5:30
पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले.
डोंबिवली - शहरातील केमिस्ट बांधवांना फोनवर धमकावून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या तोतया ड्रग इन्स्पेक्टर वर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे वतीने पोलिसांना केली आहे. याबाबत चे निवेदन आणि फसवणुकीचे पुरावे पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) श्सुरेश मदने , पोलीस हवालदार मंदार यादव मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली पुर्व यांच्याकडे सादर केले. यावेळी डोंबिवली असोसिएशनकडून दिलीप देशमुख, राजेश कोरपे, निलेश वाणी, शिवाजी आव्हाड, दिनेश यादव उपस्थित होते.
डोंबिवली शहरातील मेडिकल दुकान मालकांना मी ड्रग इन्स्पेक्टर बोलतोय असा फोन करून तुमच्या कडून घेतलेल्या औषधांमुळे एकाची प्रकृती गंभीर झालेली आहे, तुमची ऑनलाइन तक्रार आलेली आहे. आपले दुकानावर निलंबनाची कारवाई करावी लागेल दुकान सिज होईल अश्या प्रकारची बतावणी करून प्रथम दुकानदारांना घाबरविले जाते. नंतर आपण उपचारासाठी तात्काळ पैसे पाठवा मगच प्रकरण थांबवता येईल असे सांगून ऑनलाइन हजारो रुपये उकळले जात आहेत.
डोंबिवली शहरातील अनेक केमिस्ट दुकानदारांना अश्या प्रकारे फोन आले आहे. याबाबत चे सर्व पुरावे पोलिसांकडे केमिस्ट संघटनेने सादर केले. तोतया ड्रग इन्स्पेक्टर ची एक टोळी असल्याची शंका व्यक्त केली जात असून लाखो रुपयांची लूट यांनी केली असल्याचे लक्षात येत आहे. असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात देखील झालेले आहे. पुणे एफडीए विभागाने काढलेले परिपत्रक देखील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले.