"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: July 6, 2024 03:15 PM2024-07-06T15:15:52+5:302024-07-06T15:17:38+5:30
हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.
कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहेत. हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. हे काम तळोजापासून सुरु करण्यात यावे. कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंंट कॉंक्रिटीकरणापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम भूसंपादन अभावी रखडले आहे. रस्ते बाधितांना ३०० कोटी रुपयांचा मोदबला देणे बाकी आहे. हा मोबदला तातडीने देऊन रस्ते विकासाचे रखडलेले काम मार्गी लावावे. २७ गावांची नगरपालिका करण्याचा विषय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी २७ गावांपैकी महसूली उत्पन्न देणारी ९ गावे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात ठेवली आहेत. याशिवाय १४ गावे वगळून ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली आहे. २७ आणि १४ गावांप्रकरणी सरकारकडून ठाेस भूमिका घेतली जात नाही. २७ गावात एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्याकडून गृह संकुले उभारली जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा काही भाग ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि प्राधिकरणाकडून विकास कामांचे नियोजन शून्य आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामात समन्वयाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासह गटारांची कामे केले आहे. ती पुन्हा खोदून करावा लागत आहेत. डोंबिवली जिमखान्यासमाेरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या तीन महिन्यात तो रस्ता खोदावा लागला. तो पुन्हा केला जात आहे. मात्र अशा प्रकारे बेजबादारपणे काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डाेंबिवली महापालिका ह्द्दतील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे.
अमृत पाणी पुरवठा योजना ही पाणी विरतण व्यवस्था समक्ष करण्यासाठी आहे. या योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.