कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा कार्यालयात नवे फर्निचर घ्यावे लागेल; शिंदे सेनेचा महावितरण कंपनीला इशारा
By मुरलीधर भवार | Published: June 15, 2024 07:53 PM2024-06-15T19:53:32+5:302024-06-15T19:53:45+5:30
यावेळी त्यांनी हा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे. वीज ग्राहकांना वारेमाप वीज बिले पाठविली जातात. वीजेचा वापर कमी असताना बिले जास्त आकारली जातात.
कल्याण-वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा कार्यालयात नवे फर्निचर घ्यावे लागेल असा इशारा शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी अधिकारी वर्गास दिला आहे. वीज वितरण कंपनीचा गेल्याा अनेक दिवसापासून भोंगळ कारभार सुरु आहे. या विरोधात आज शिंदे सेनेचे शहर प्रमुख पाटील यांनी कल्याणच्या तेजस्वीनी कार्यालयात भेट दिली.
यावेळी त्यांनी हा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे. वीज ग्राहकांना वारेमाप वीज बिले पाठविली जातात. वीजेचा वापर कमी असताना बिले जास्त आकारली जातात. मीटरमध्ये दोष असताना त्याच्या तक्रारी केल्यावर त्या दूर केल्या जात नाहीत. दरवर्षी ग्राहकांना अनामत रक्कम आकारली जाते. बील भरले नाही तर लगेच वीज पुरवठा खंडीत केला जातो. मात्र वीज पुरवठा खंडीत झाल्यावर ग्राहकांनी तक्रारी करुन ही वीज पुरवठा सुरळित केला जात नाही. स्मार्ट वीज रिडिंग मीटर लावण्याचे काम सुरु आहे. या स्मार्ट वीज रिडिंग मीटरला विरोध नाही. त्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम आधी कंपनीकडून दूर झाला पाहिजे.
त्याविषयी जनजागृती केली पाहिजे. अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. त्याचे निराकरण केले जात नाही. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे वर्तन उद्धट आहे. त्यात सुधारणा झाली पाहिजे. जनतेच्या सेवकाकडून योग्य उत्तरे दिली पाहिजेत. योग्य उत्तरे मिळणार नसली तर लवकर कार्यालयासाठी नवे फर्निचर घ्यावे लागेल असा सूचक इशारा पाटील यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत अधिकारी वर्गाने पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेल्या तक्रारी समजून घेत त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.