एमआयडीसी निवासी महानगर गॅस लाईन फुटली: मोठा अनर्थ टळला
By अनिकेत घमंडी | Published: March 15, 2024 05:05 PM2024-03-15T17:05:11+5:302024-03-15T17:06:01+5:30
सुदैवाने त्या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक घाबरले आहेत.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसी निवासी मधील गणेश मंदिर जवळ भूमिगत महानगर गॅसची पाइपलाइन एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्यांचे खोदकाम करतांना फुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी २:२० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक घाबरले आहेत. त्या घटनेनंतर त्या परिसरात गॅस पसरून उग्र दर्प आला. घटना घडताच काही जागरूक रहिवाशांनी फायर ब्रिगेड आणि महानगर गॅस कंपनी या यंत्रणांना तात्काळ कळवले आणि त्या जवळील रस्त्याची वाहतूक थांबवली.
त्याची नोंद घेत महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही तातडीने येऊन पाइपलाइन मधील गॅस पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. निवासी भागातील काही परिसरात त्यामुळे गॅस पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर महानगर गॅस पाइपलाइन फुटण्याची ही दोन महिन्यांतील निवासी भागातील तिसरी घटना असून एक महिन्यापूर्वी सुदर्शन नगर मध्ये रस्तेकामाच्या वेळी अशीच लाईन फुटली असल्याची माहिती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली. फुटलेली गॅस वाहिनी दुरुस्तीसंदर्भात पुढील कार्यवाहीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.