डोंबिवली एमआयडीसीत हायटेन्शन वायरला फांदी स्पर्श; झाडाला लागली आग
By अनिकेत घमंडी | Published: December 1, 2023 09:45 AM2023-12-01T09:45:40+5:302023-12-01T09:46:02+5:30
वाहतूक कमी असल्याने त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही, सुदैवाने जीवितहानी नाही.
डोंबिवली: येथील एमआयडीसीमध्ये आर आर हॉस्पिटल समोर रस्त्याला लागून असलेल्या झाडांच्या फांद्या हायटेन्शन वायरला स्पर्श झाल्याने गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोठी आग लागली होती. त्या रस्त्यावर दिवसंरात्र मोठ्या प्रमाणत वाहतूक चालू असते पण मध्यरात्र असल्याने वाहतूक कमी असल्याने त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही, सुदैवाने जीवितहानी नाही.
घटना घडताच परिसरातील रहिवासी, दक्ष नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणुन तातडीने अग्निशमनदलाला कळवले, त्यानूसार ते कर्मचारी येऊन त्यांनी अल्पवधीत आग् विझवली, व यापुढे पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी येथील झाडांच्या फांद्या तोडून टाकल्या. यामुळे या परिसरातील वीज पुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. एमआयडीसी निवासी भागात हायटेन्शनला स्पर्श होणाऱ्या अशा बऱ्याच झाडांच्या फांद्या आहेत. येथील नागरिकांनी त्याचा तक्रारी महावितरणकडे केल्या आहेत पण त्याची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. अशा प्रकारे हायटेन्शनला आग लागून दुर्घटना होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने महावितरणने खबरदारी घेऊन वेळोवेळी फांद्या तोडण्याची मोहीम राबवली पाहिजे, अशी मागणी येथील रहिवासी राजू नलावडे यांनी केली आहे.