कल्याणमध्ये काॅंग्रेसचे रास्ता राेकाे आंदाेलन, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
By मुरलीधर भवार | Published: March 25, 2023 05:36 PM2023-03-25T17:36:41+5:302023-03-25T17:36:59+5:30
गुजरातमधील सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे.
कल्याण- गुजरातमधील सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द केली. या करावाईच्या विराेधात कल्याणमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध व्यक्त करीत रास्ता राेकाे आंदाेलन केले.
शहराच्या पश्चिम विभागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमाेर हे आंदाेलन आज करण्यात आले. काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदाेलनात पक्षाचे पदाधिकारी नवीन सिंग, अमित म्हात्रे, रत्नप्रभा म्हात्रे, ब्रीजकुमार दत्त, शकील शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
डोक्यावर काळया फिती बांधून कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी याआधी देखील इंदिरा गांधी, राजीव गांधी ,मनमोहन सिंग या पंतप्रधान बद्दल भाजप नेत्यांनी पातळी सोडून वक्तव्य केलं तो देशद्रोह नव्हता का असा सवाल केला. पुढे बोलताना राहुलजींनी २०१९ साली केलेला वक्तव्याचा संदर्भ देवून कारवाई करणे ही लोकशाहीची हत्या आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू त्याचा जाहिर निषेध करीत आहाेत.