नवरात्रीत ‘लीली’ने खाल्ला भाव, झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी
By सचिन सागरे | Published: October 15, 2023 04:50 PM2023-10-15T16:50:27+5:302023-10-15T16:51:36+5:30
सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. नवरात्रीत झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. गत वर्षाच्या नवरात्री उत्सवाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फुलांचा भाव स्थिर आहे.
कल्याण : घटस्थापनेसाठी महत्वाच्या असलेल्या फुलांनी कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट आणि शहरातील काही रस्ते रविवारी फुलले होते. नवरात्रीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असली तरी यंदा लिलीच्या फुलांनी भाव खाल्ला आहे. कृत्रिम फुलांनी अनेकांना भुरळ पाडल्याने यंदा झेंडूच्या फुलांना फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गणेशोत्सवानंतर पितृपंधारवड्यात फुलांचा भाव घसरला होता.
सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. नवरात्रीत झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. गत वर्षाच्या नवरात्री उत्सवाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फुलांचा भाव स्थिर आहे.
कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आळे फाटा, बनकर फाटा, जुन्नर, नाशिक, सिन्नर, नगर, पुणे आदी भागातून फुलांची आवक होते. तसेच पालघर जिल्ह्यातून वाडा, मोखाडा, विक्रमगड येथून मोगऱ्याच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. रविवारी सुमारे दीडशे गाड्यांमधून फुलांची आवक झाली.
प्लास्टिक तसेच कपड्याच्या फुलांकडे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागल्याने नैसर्गिक फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्याचा शेतकऱ्यांच्या मालावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने माल फेकण्याशिवाय पर्याय उरला नाही.
पितृपंधरवड्यात फुलाच्या विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद नव्हता. सणासुदीच्या काळात शेतकरी माल घेऊन लांबून येतात. मात्र, कपड्याच्या आणि कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांकडील मालाला योग्य भाव मिळत नाही. आणि त्यामुळे नाईलाजाने फुले फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एपीएमसी तसेच केडीएमसी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे फुल व्यापारी शशिकांत कदम यांनी सांगितले.
कल्याण एपीएमसीतील फुलांचे दर
लिली – १६० रुपये
गुलछडी – १५० रुपये
गुलाब – १२० रुपये (बंडल)
अष्टर – ८० रुपये किलो
शेवंती – ८० रुपये किलो
झेंडू – १०/२० रुपये (किलो)