मध्यरात्रीत परफ्युम, डाइंग कंपनीना आगडोंब, स्फोटाने डोंबिवली हादरली
By अनिकेत घमंडी | Published: March 9, 2023 01:31 PM2023-03-09T13:31:51+5:302023-03-09T13:32:07+5:30
खंबाळपाडा भागातील रामसन्स, प्राज डाइंग कंपन्या आगीत भस्मसात, ७ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
डोंबिवली - एमआयडीसी फेज १ मधील खंबाळपाडा येथील सीएनजी पंपच्या पाठीमागे असलेल्या रामसन्स परफ्युम प्रायव्हेट लिमिटेड आणि प्राज डाइंग या दोन कंपन्यांमध्ये बुधवारी मध्यरात्री १२.५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. परफ्युमसाठी लागणारे केमिकल, ऑइल, गॅस यांमुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप।धारण।केले, डोंबिवली पश्चिम, कल्याण ग्रामीणमध्येही आगीचे डोंब, स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच पळ काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंपन्या मात्र आगीत भस्मसात झाल्या. सीएनजी पंपच्या पाठीमागे असलेल्या कंपनीत आग लागल्याने आणि आगीत सतत स्फोट होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने त्या पंपाला सुरक्षित ठेवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुरुवातीला त्या कपन्यांजवळ कोणीही जाऊ शकत नव्हते एवढी प्रचंड आग, भडका उडत होता. परफ्युमचे असलेले।छोटे डबे आकाशात उंच उडून फुटत होते. बाजूलाच असलेल्या डाइंग कंपनीने देखील पेट घेतला आणि तिथेही वार्यासारखी आग पसरली. तब्बल सात तासांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत यंत्रणांचे कुलींगचं काम सुरू होते. घटनास्थळी मध्यरात्रीच कंपन्यांचे मालक आल्याची माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. आग लागली तेव्हा दोन्ही कंपन्या बंद होत्या, त्यामुळे जीवित हानी झाली नसली तरी सर्वप्रथम आग लागलेल्या परफ्युम कंपनीमध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली त्याचे कारण मात्र समजू शकले नाही. सोनी म्हणाले की, अग्निशमन दलाच्या १० बंबांनी आग आटोक्यात आणली, मात्र त्या गाड्या घटनास्थळी यायला विलंब झाल्याने आग वाढली.
डोंबिवलीतील गाड्या वगळता त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यानंतर अंबरनाथ,उल्हासनगर, कल्याण, भिवंडी आदींसह ठिकठिकाणाहून बंब आल्याचे सांगण्यात आले, मात्र तो पर्यन्त आग पसरली होती, आणि कपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. मोठमोठे स्फोट होऊन आगीचे लोळ उंचचउंच उडत होते. यामुळे एमआयडीसी फेज १ मधील खंबाळपाडा येथील आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. गेल्या काही वर्षात डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याना यापूर्वीही मोठे अपघात झाले असून प्रोबेस कंपनीमधील स्फोट, अंबर केमिकल कंपनीत स्फोट हे न विसरण्यासारखे आहेत. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीमधील घातक केमिकल कंपन्या स्थलांतरीत कराव्या, अशी नागरिकांची जुनीच मागणी यानिमित्ताने पुन्हा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यावर अद्याप ठोस उपाय सरकाने काढलेला नाही. आणखी कुठलीही भीषण दुर्घटना होण्यापूर्वी सरकारनं लक्ष द्यावं, असं आवाहन करण्यात येत आहे. -
डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये सोनारपाडा टेम्पो नाकाजवळ असलेल्या लेदर बेल्ट कंपनीला देखील भीषण आग लागली होती. ती कंपनीही बंद होती. मात्र तरीही संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागल्याची घटना गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला घडली होती. त्या कंपनीतील कामगारांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली होती. तो अपघात, त्यात लागलेली आग मोठी होती. त्यावेळीही आगीचा।मुद्दा समोर आला होता, प्रत्यक्षात मात्र पुढे काहीही झाले नाही.