दोन दिवसांत एमआयडीसीच्या गतीरोधकांवर मारलेला पांढर्या पट्ट्यांचा रंग झाला फिका: रंगच निकृष्ट दर्जाचा?
By अनिकेत घमंडी | Published: August 22, 2023 12:26 PM2023-08-22T12:26:43+5:302023-08-22T12:27:43+5:30
रहिवाश्यांनी केला शासन यंत्रणेचा निषेध, रिमझिम पावसात रंग उडाला.
अनिकेत घमंडी, डोंबिवली : एमआयडीसी निवासी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवर स्पीडब्रेकरवर दुचाकींचे अपघात झाल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने पांढरे पट्टे मारले पण त्यासाठी वापरण्यात आलेल्या रंगाचा दर्जा अतिशय खराब, निकृष्ट आहे,।सोमवार, मंगळवारी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी तो रंग निघाला. आता जोराचा पाऊस आला तर तर उरला सुरला पांढरा रंग जास्त खराब होणार असे दिसत आहे.
स्पीडब्रेकरवर थरमोप्लास्टिक रंगाने पांढरेपट्टे मारणे आवश्यक होते, पण तसे न करणार्या संबंधित शासन यंत्रणेच्या कामाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या स्पीडब्रेकर बनविणे आणि त्यानंतर त्यावर मारण्यात आलेले पांढरे पट्टे यावरून येथील राजकीय पदाधिकारी यांचात श्रेयाची लढाई चालू होती. आमच्याच प्रयत्नाने हे काम झाले असे त्यांचे म्हणणे होते. पण स्पीडब्रेकरवर जे अपघात झाले याची ते जबाबदारी घेणार का ? असा सवाल नागरिकांनी केल्याची माहिती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली. सदर स्पीड ब्रेकरमुळे एका रिक्षेचा अपघात झाला, त्यात कोणी जखमी।झाले नाही. त्या ठिकाणी जे पट्टे मारायचे काम झालाय ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे कारण त्यात रेडिअम किंवा नवीन तंत्रज्ञान चा उपयोग न करता साधा पेंटचे पट्टे मारण्यात आले आहेत.
त्यामुळे जर पावसाने जोर धरला तर ते सर्व निघून जाऊन पून्हा अपघात होतच राहणार का? असा सवाल नागरिकांनी केला. शासन यंत्रणा लोकांना मुर्ख बनवत असून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याची टीका नागरिकांनी केली. कशाही पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांच्या वेगावर नियंत्रण हवे म्हणून स्पीड ब्रेकरची मागणी ही सुदर्शननगर मधील जेष्ठ नागरिकांनी केली होती. त्यानूसार काही दक्ष नागरिकांनी कंत्राटदाराची भेट घेऊन त्या ठिकाणी स्कलंबरर टाईप स्पीड ब्रेकर घालावेत अशी मागणी केली।होती, पण तसे झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे नलावडे म्हणाले.