डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

By अनिकेत घमंडी | Published: October 19, 2023 03:46 PM2023-10-19T15:46:22+5:302023-10-19T15:46:26+5:30

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत.

Inauguration of first law college in Dombivli; College with 60 student capacity | डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे कल्याण, डोंबिवली परिसरातील पहिले विधी महाविद्यालय आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद शाळेच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

या महाविद्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासन, भारतीय विधिज्ञ परिषद यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे. कल्याण न्यायालय सुविधांच्या बाबतीत गैरसोयीचे झाले आहे. वकिल, आशिलांची संख्या वाढतेय त्याप्रमाणात न्यायालयाच्या वास्तुत पुरेशा सुविधा नाहीत. वकील, आशिलांना न्यायालय आवारात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नाही. अशीच परिस्थिती भिवंडी न्यायालयाची आहे.

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. कल्याण न्यायालयाची इमारत भूस्तरावर वाढू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आपणाकडे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण न्यायालयाच्या विस्तारासाठी अनुकूल आहेत. तेव्हा कल्याण न्यायालयातील वकिलांनी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव दिला तर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी उपस्थित वकील संघटनेच्या पदाधिकऱ्यांना दिले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासा बरोबर डिजिटल, कृत्रिम बुध्दिमत्तेचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत नक्कीच विद्यार्थ्यांना सचोटीचे धडे मिळतील. कायद्याचे ज्ञान घेऊन बाहेर पडलेले या महाविद्यालयातील विद्यार्थी ताठ बाण्याने समाजाचे, अन्याय-अत्याचाराचे, शहर हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतील,’ असा विश्वास कुलगुरू डाॅ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. डोबिवलीत व्यवस्थापन, क्रीडा, कला महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे, असे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सांगितले. विनाअडथळा मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याचे, प्रवेश पूर्ण झाल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी केले

Web Title: Inauguration of first law college in Dombivli; College with 60 student capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.