स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही; आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
By मुरलीधर भवार | Published: January 30, 2023 07:54 PM2023-01-30T19:54:50+5:302023-01-30T19:55:39+5:30
स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही असा सल्ला आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कल्याण: यशाचा कोणताच शॉर्टकट नाही, हे मनावर बिंबवा, आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी विध्यार्थ्यानी शिक्षण हेच महत्वाचे साधन आहे, हे ठरवून जिद्द, प्रचंड मेहनत अंगी बाळगून स्पर्धेत स्वतःला झोकून द्या यश निश्चित मिळेल असा सल्ला आयकर विभागाचे आयुक्त अखिलेंद्र यादव यांनी जीवनदीप महाविद्यालयात विध्यार्थ्याशी संवाद साधताना दिला. यावेळी बदलत्या आर्थिक स्थितीत आयकर कायदा आणि आयकर विषयक विध्यार्थ्यानी सजग राहावे असे सांगत आयकर कायद्याची माहिती सविस्तर दिली.
जीवनदीप महाविद्यालयात नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन सोहळा आयकर आयुक्त यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी आयुक्त यादव यांनी उपराेक्त सल्ला विद्यार्थी वर्गास दिला. कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील क्रीडा आणि अन्य स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा, व्यक्तिगत आणि सांघिक गुणगौरव आयुक्त यादव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख प्राचार्य डॉ. के.बी. कोरे यांनी मांडला. तर संस्थेचे आध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी जीवनदीप शिक्षण संस्था ग्रामीण भागात वंचिताच्या शिक्षणासाठी कसे काम करत आहे याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोरे यांनी केले. टिटवाळा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सिने आभिनेते व दिग्दर्शक दिपक पाटील उपस्थित हाेते. सूत्रसंचालन प्रा. प्रिया जाधव आणि प्रा.पौर्णिमा एगडे यांनी तर आभार प्रा. डॉ.दौलतराव कांबळे यांनी मानले.