घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्हयातील अट्टल चोरटे जेरबंद
By प्रशांत माने | Published: March 4, 2024 03:39 PM2024-03-04T15:39:10+5:302024-03-04T15:39:40+5:30
मानपाडा पोलिसांची कारवाई, पोलिसांच्या चौकशीत पठाण आणि शहा याने मानपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरी केल्याचे समोर आले.
डोंबिवली - घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्हयातील अट्टल चोरटयांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चोरी आणि घरफोडीचे प्रत्येकी पाच, तर चैन स्नॅचिंगचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. रिक्षा चोरीच्या गुन्हयात सात रिक्षांसह, घरफोडीच्या गुन्हयात चोरीला गेलेला १ लाख १९ हजार तर चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील १ लाख २० हजाराचा माल जप्त केला आहे.
वाहनचोरीच्या घटना घडत असताना मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश राळेभात आणि पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून सराईत गुन्हेगार नासीर पठाण आणि शाहरूख शहा या दोघांना २८ फेब्रुवारीला टाटा नाका परिसरातून अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत पठाण आणि शहा याने मानपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरी केल्याचे समोर आले. दोघांकडून एकुण ३ लाख ७० हजार रूपयांच्या सात रिक्षा जप्त केल्या आहेत. तर पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. नासीर पठाण सराईत गुन्हेगार असून यापुर्वी त्याला पाच गुन्हयात अटक झाली होती. आर्थिक फायदयाकरीता तो रिक्षा चोरायचा अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
चैन स्नॅचर गजाआड
२० जानेवारीच्या सागांव येथील चैन स्नॅचिंगच्या गुन्हयाचा तपास करताना पोलिसांनी चार चैन स्नॅचरना गजाआड केेले आहे. स्वप्नील माधवानी उर्फ करकटया बाबु, कलीम शेख, जावेद शेख आणि इरफान शेख सर्व रा. मुंब्रा, कळवा अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात टिळकनगर, रामनगर, कळवा, चितळसर पोलिस ठाण्यात याआधी आठ गुन्हे दाखल आहेत.
घरफोडीच्या गुन्हयांची उकल
घरफोडी गुन्हयातील अफताब ईर्शाद मोमीन या सराईत चोरटयाला अटक केली आहे. साथीदार तौसिफ अन्सारी याच्यासह मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून सोने, चांदिचे कॉईन, आठ हजार रूपयांची रोकड,एक मोबाईलचा इअरफोन असा ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दावडी येथील घरफोडी प्रकरणात राहुल घाडगे या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधातही यापुर्वी ९ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी दिली