टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव : माधव जोशी
By अनिकेत घमंडी | Published: March 11, 2024 10:32 AM2024-03-11T10:32:52+5:302024-03-11T10:33:42+5:30
टाटा एक विश्वास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
डोंबिवली: टाटा समूहासाठी समुदाय हा केवळ व्यवसायातील एक भागीदार नाही, तर प्रत्यक्षात त्याच्या अस्तित्वाचा मूळ हेतू आहे,
काही कंपन्या त्यांच्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवतात पण त्यापलीकडे जाऊन सचोटी, गुणवत्ता ,विश्वास आणि इतर मूल्यांशी तडजोड न करता समाजासाठी संपत्ती निर्माण करून जनतेचा सन्मान मिळवणाऱ्या फार कमी आहेत, असे लेखक माधव जोशी यांनी सांगितले. टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव असल्याचे ते म्हणाले.
' टाटा एक विश्वास ' या त्यांच्या पुस्तकाचे मोरया प्रकाशन ने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक यांच्याहस्ते रविवारी शब्दांगण या साहित्यिक उपक्रमाच्या २५२ व्या सत्रात संपन्न झाले.
ध्रुव आय ए एस अकादमी आणि डोंबिवलीकर कल्चर क्लबचे प्रभू कापसे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.सानिका हिने सूत्र संचालन केले.
त्यावेळी जोशी यांचे ' माझी टाटा विश्वातील सफर ' या विषयावर भाषण आणि प्रश्नोत्तरे हा कार्यक्रम रंगला. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या संस्था टाटा ट्रस्टने स्थापन केल्या. त्यामुळेच आपल्या देशात टाटा समूहाविषयी भक्तिभाव असे जोशी यांनी प्रतिपादन केले.