लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार
By अनिकेत घमंडी | Published: September 6, 2022 12:26 PM2022-09-06T12:26:31+5:302022-09-06T12:27:40+5:30
ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली
डोंबिवली :
ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली, त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या, मात्र असे असले तरीही लाईनमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असून त्यांनी दैनंदिन कामासारखे ट्रॅकची पाहणी करत असताना त्यांना किमी 50 जवळ ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. मुंबईहुन कल्याणच्या दिशेने अतिशय स्पीडने येणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला त्यांनी आधी रेड सिग्नल अलर्ट देऊन थांबवले.
त्यामुळे त्या मागच्या येणाऱ्या अन्य लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती. मिथुनकुमार आणि हिरालाल अशी त्या दोघांची नाव असून मिथुन कुमार यास ट्रॅक फ्रॅक्चर असल्याचे समजले, त्याने हिरालाल यास सतर्क केले, त्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखून लांबपल्याच्या गाड्या थांबवून संभाव्य अपघात टळला. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली असून ते दोघेही कौतुकास पात्र असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल असेही ठरवण्यात आल्यास मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.