भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा; खासदार कपिल पाटलांची MMRDA आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:56 PM2021-06-22T16:56:58+5:302021-06-22T16:57:22+5:30

 ६० गावांसाठी रिंगरोडचा आग्रह

Initiate tender process for Bhiwandi-Kalyan Metro route; MP Kapil Patil demand to MMRDA Commissioner | भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा; खासदार कपिल पाटलांची MMRDA आयुक्तांकडे मागणी

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा; खासदार कपिल पाटलांची MMRDA आयुक्तांकडे मागणी

Next

कल्याण: बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी सोमवारी श्रीनिवासन यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.

कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्यापी काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली. बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्यापि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.

Web Title: Initiate tender process for Bhiwandi-Kalyan Metro route; MP Kapil Patil demand to MMRDA Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.