स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये नाविन्यपूर्ण पुस्तक हंडी
By अनिकेत घमंडी | Published: September 7, 2023 12:23 PM2023-09-07T12:23:53+5:302023-09-07T12:24:07+5:30
इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी "श्रीकृष्ण व सुदामा भेट"ही छोटीशी नाटिका सादर केली.
डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेत गोपाळकाला निमित्त "पुस्तक हंडी" साकारण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या नाविन्यपूर्ण उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुलभा बोंडे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रसिका फडके,संस्था सदस्य माधवी कुलकर्णी, बोंडे व पर्यवेक्षिका जयश्री दौंड या उपस्थित होत्या.
यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी "श्रीकृष्ण व सुदामा भेट"ही छोटीशी नाटिका सादर केली. यामध्ये श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीपूर्ण भेटीचे वर्णन करण्यात आले. त्यानंतर "पुस्तक हंडी" साकारण्यात आली. "पुस्तक हंडीत" पुस्तकांच्या नावांच्या चिठ्ठ्या तसेच काही शालेय उपयोगी वस्तू जसे की पेन,खोडरबर,पेन्सिल, स्केचपेन ठेवण्यात आले होते. सर्वप्रथम मुलांनी व मुलींनी पुस्तक हंडीला थर लावून सलामी दिली. त्यानंतर पुन्हा थर लावण्यात आले व त्यावर श्रीकृष्णाने चढून पुस्तक हंडी फोडली.
पुस्तक हंडी फोडल्यानंतर खाली बसलेल्या मुलांनी एक- एक चिठ्ठी व उपयोगी वस्तू गोळा केल्या. त्या चिठ्ठीत नाव असणारे पुस्तक पाहुण्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्याला एक महिना वाचण्यासाठी देण्यात आले आणि महिन्यानंतर पुन्हा दुसरे पुस्तक बदलून देण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रसिका फडके यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. व आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
श्रीकृष्ण व सुदामा भेट ही नाटिका बसवून घेण्याचं काम पल्लवी गवळी आणि अनंता खरपडे यांनी केले. विद्यार्थ्यांची वेशभूषा मोनिका पाटील व संदेश गवारी यांनी करून घेतली. विद्यार्थ्यांचा सराव दिलीप दळवी व गोविंद राठोड तसेच विद्यार्थिनींचा सराव शशिकला कांबळे व कुमुदिनी नेमाडे यांनी करून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी उर्वी गोडबोले हीने तर आभार मधुरा शिंदे हिने मानले.