कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
By अनिकेत घमंडी | Published: June 21, 2024 04:27 PM2024-06-21T16:27:01+5:302024-06-21T16:28:44+5:30
नरेंद्र पवार फाऊंडेशन- पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ६८ ठिकाणी आयोजन.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नरेंद्र पवार फाऊंडेशन आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिमेत शुक्रवारी ६८ ठिकाणी योगदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी आमदार पवार यांच्या पुढाकाराने कल्याणात प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात योग दिनाचे साजरा केल्याची सर्वत्र चर्चा होती. ज्यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कल्याणमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून पश्चिमेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम टिटवाळापर्यंत योगदिनाचे कार्यक्रम करण्यात आली. येथील काही प्रमुख ठिकाणांसह कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्येहीही योग दिन साजरा करण्यात आला. या योगदिनासाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणि योग शिक्षक हेदेखील नरेंद्र पवार फाऊंडेशन आणि पतंजली योग समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते.
यापैकी काही ठिकाणच्या कार्यक्रमांत पवार यांनीही सहभागी होत नागरिक आणि विद्यार्थ्यांसह योगासनंही केल्याचे दिसून आले. मनुष्याच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून आज योग आणि योगासनांना संपूर्ण जगभरात मान्यता मिळाली असल्याची भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आज प्रत्येक जण आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवलेल्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. या विकारांवरील रामबाण उपाय हा योगच असून प्रत्येकाने योगसाधना करणे गरजेचे असल्याचे सांगत पवार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आणि रोज नियमित योगसाधना करण्यासाठी आवाहन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि पतंजली योग समितीच्या सर्व पदाधिकारी - सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
डोंबिवलीतही योग विद्याधाम नाशिक या संस्थेच्या डोंबिवली सेंटरच्या माध्यमातून रामनगर येथे सकाळी योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी संस्थेचे संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.