आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला
By मुरलीधर भवार | Published: January 23, 2023 04:21 PM2023-01-23T16:21:58+5:302023-01-23T16:22:16+5:30
मुरलीधर भवार, कल्याण: नाकाने कांदे साेलू नका. आत्मपरिक्षण करा. आत्ता तरी सुधरा. टिका टिपणीतून बाहेर या असा टाेला विधान ...
मुरलीधर भवार, कल्याण: नाकाने कांदे साेलू नका. आत्मपरिक्षण करा. आत्ता तरी सुधरा. टिका टिपणीतून बाहेर या असा टाेला विधान परिषदेचे माजी विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांच्या पुढाकारने शहरातील पूर्व परिरातील पोटे मैदानात कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी काल सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी उपरोक्त टिका केली.
दरेकर म्हणाले की, त्यांच्याकडून गद्दार गद्दार आणि खाेके खाेके अशी टिका वारंवार केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पलिकडे काेसाेदूर गेले आहेत. तुम्ही केवळ त्यांच्यावर टिका करुन टाेमणे मारत रहा. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाची पडलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटाळे गेले. आत्ता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्याकडे लक्ष दयालला आम्हाला वेळ नाही. दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हाेते ना. त्यांनी का बाळासाहेबांचे तैलचित्र लावलं नाही असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी हिंदूत्वाचा विचार काॅंग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला.
तुम्हाला हिंदूत्व नकाे, बाळासाहेबांचा विचार नकाे, आम्ही आत्ता बाळासाहेबांचे चित्र लावताे. तर नाकाने कांदे साेलण्याचा प्रकार करीत आहात. आजाेबांचे तैलचित्र लागत असताना नातवाला आनंद झाला पाहिजे. ज्यांनी शिवसेना वाढविली. तुम्हाला सत्तेवर बसविले. तेच आत्ता गद्दार झाले तुमच्यासाठी. आत्ता तरी आत्मपरिक्षण करा. जरा सुधरा असा सल्ला दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.