फेरीवाल्यांची रिक्षास्टॅण्डमध्ये घुसखोरी; रिक्षावाल्यांचे केडीएमसी कार्यालयासमोेर ठिय्या आंदोलन
By प्रशांत माने | Published: November 8, 2023 03:41 PM2023-11-08T15:41:04+5:302023-11-08T15:43:14+5:30
दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: उच्च न्यायालयाने व्यवसायास मनाई केलेल्या रेल्वे स्थानकापासूनच्या १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांचे बिनदिक्कतपणे होत असलेल्या अतिक्रमणाचा सिलसिला सुरू असताना आज त्यांनी रिक्षास्टॅण्डमध्येही घुसखोरी केल्याने रिक्षाचालक आक्रमक झाले. थेट त्यांनी केडीएमसीचे विभागीय कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन छेडले. दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
सध्या फेरीवाला अतिक्रमणाच्या विरोधात डोंबिवलीत केडीएमसीची मोठी कारवाई सुरू आहे. कल्याणमधील अतिक्रमण विरोधी पथके डोंबिवलीत आणून त्यांच्याकडून ही कारवाई सुरू आहे. दरम्यान या कारवाईमुळे ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आल्याने फेरीवाले देखील आक्रमक झाले आहेत. काल प्रशासनाच्या कारवाईला जोरदार विरोध झाला होता. आज देखील हे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आज सकाळपासूनच फेरीवाल्यांनी पुन्हा मनाई केलेल्या १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण केले होते. रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षास्टॅण्डच्या ठिकाणी देखील फेरीवाल्यांनी बस्तान ठोकल्याने रिक्षाचालक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय गाठले आणि फेरीवाल्यांना परवानगी दिली कोणी असा सवाल तेथील कर्मचा-यांना करण्यात आला. मनपा प्रशासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही केली गेली. दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मिळाल्यावर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले. कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी विभागीय कार्यालयातून निघत वाहतूक पोलिसांचे कार्यालय देखील गाठले होते.
त्यांचे स्टॅण्ड अधिकृत आहेत का?
फेरीवाल्यांनी पाटकर रिक्षास्टॅण्ड, चिमणीगल्ली, नेहरू रोड, भाजीमार्केट परिसरात अतिक्रमण केले होते. याठिकाणी असलेल्या रिक्षास्टॅण्डमध्ये फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचा आरोप रिक्षाचालकांचा आहे. परंतू त्यांचे स्टॅण्ड अधिकृत आहेत का? असा सवाल फेरीवाल्यांनी केला आहे.