डोंबिवलीत दिव्यांग रेल्वे डब्यात प्रवाशांची घुसखोरी, आणखी एक व्हिडिओ व्हायरल
By अनिकेत घमंडी | Published: July 2, 2024 06:20 PM2024-07-02T18:20:09+5:302024-07-02T18:20:23+5:30
डब्यासमोर पोलीस कार्यरत नव्हते हे स्पष्ट झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
डोंबिवली: दिव्यांग प्रवाशांच्या डब्यात घुसखोरी करणारा आणखी एक व्हिडीओ मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. डोंबिवली स्थानकात फलाट ५ वरील असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. त्या लोकलसमोर दिव्यांग डब्यात अन्य सामान्य प्रवाशांनी जाऊ नये, त्यासाठी मज्जाव करायला फलाटात त्या डब्यासमोर पोलीस कार्यरत नव्हते हे स्पष्ट झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
याआधीही गेल्या आठवड्यात फलाट ३ वरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात एक दिव्यांग महिला लोकल सुरू होईपर्यंत खालीच राहिली होती, सहप्रवाशांनी उचलून तिला डब्यात ठेवले, क्षणात लोकल सुरू झाली. सुदैवाने त्यात कोणताही अपघात झाला नाही, परंतु अशा पद्धतीने दिव्यांग नागरिकांची अडवणूक होते, त्यांना प्रवास करताना अडचणी येतात.
अन्य प्रवासी डब्यात ते चढत नाहीत, कारण त्यांना प्रवेश मिळू शकत नाही. मात्र आता त्यांच्यासाठी राखीव डब्यात गर्दीमुळे प्रवासी सर्रास चढतात, असे केवळ डोंबिवलीच नव्हे तर ठिकठिकाणच्या स्थानकातले दृश्य आहे. डोंबिवलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याची चर्चा होते, अन्य ठिकाणी घटना घडूनही त्याची वाच्यता।होत नाही अशी प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातून व्यक्त झाली. अनेकदा पोलीस हटकतात, परंतु गर्दीच प्रचंड असल्याने प्रवाशांना पर्याय नसल्याने प्रवेश केला जात असल्याची प्रांजळ प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.