‘आधारवाडी’तील कचऱ्यात डिझेलच्या बाटल्या, आगी लावल्या जात असल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:09 AM2021-03-30T02:09:24+5:302021-03-30T02:09:54+5:30
दरवर्षी उन्हाळ्याला प्रारंभ होताच आधारवाडी डम्पिंगला आग लागते. ही आग लागते की लावली जाते, असा संशय वारंवार व्यक्त केला जातो. परंतु, शनिवारी पहाटे डम्पिंगला लागलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना डिझेलने भरलेल्या चार ते पाच बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण - दरवर्षी उन्हाळ्याला प्रारंभ होताच आधारवाडी डम्पिंगला आग लागते. ही आग लागते की लावली जाते, असा संशय वारंवार व्यक्त केला जातो. परंतु, शनिवारी पहाटे डम्पिंगला लागलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना डिझेलने भरलेल्या चार ते पाच बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बाटल्या कचऱ्यात ठरावीक अंतराने दडवून, खुपसून ठेवल्या होत्या. येथील आगींसंदर्भात याआधी गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु, काहीच निष्पन्न झालेले नाही. मात्र, आता डिझेलच्या बाटल्यांवरून आग मुद्दाम लावण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मनपा संबंधितांवर कठोर कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षापर्यंत डम्पिंगवर ६५० टन कचरा टाकला जात होता. परंतु, काही महिन्यांपासून शून्य कचरा मोहीम राबविली जात असल्याने डम्पिंगवर कचरा टाकण्याचे प्रमाण अवघे ४० ते ४२ टनावर आले आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात येथील डम्पिंगला आग लागते. उन्हात कचरा तापतो, त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात, असे कारण दिले जात होते. परंतु, वारंवार घडणाऱ्या घटना पाहता आगी कोणीतरी लावत असल्याच्या तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनपाने केल्या आहेत.
१६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. रात्री ९.३० च्या सुमारास डम्पिंगला लागलेली आग खोलवर गेल्याने पुढे पाच दिवस धुमसतच होती. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीसह ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्यापर्यंत पसरले होते. डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंप बंद ठेवण्यात आला होता. या आगीच्या घटनेचीदेखील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार माहिती
यासंदर्भात कल्याण अग्निशमनचे अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी डम्पिंगवर डिझेलच्या बाटल्या आढळल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी आपण आगीच्या घटनांसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र डिझेलच्या बाटल्यांबाबत आपणास माहिती नाही. त्याची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शनिवारी पहाटेही डम्पिंगला आग लागली होती. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना डम्पिंगच्या परिसरात डिझेल भरलेल्या बाटल्या निदर्शनास पडल्या. सहसा कोणालाही दिसणार नाहीत, अशा पद्धतीने त्या बाटल्या कचऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या.