"दिवाळी होती, लोकांच्या घरात कंदील लागले होते अन्..."; मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 02:28 PM2024-07-13T14:28:36+5:302024-07-13T14:30:45+5:30
राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली.
कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. दिवा शहरातील पायाभूत सुविधा आणि इथल्या अधिकाऱ्यांच्या हप्तेबाजीवर निशाणा साधत दिव्याचे सिंगापूर करणार होते या गोष्टीची देखील त्यांनी आठवण करून दिली. त्याचप्रमाणे येथील पुलाच्या कामासाठी ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आलं यावर सुद्धा पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली.
दिवा विभाग ठाणे महापालिकेमध्ये येतो की नाही अशी शंका येते. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरात हॉस्पिटल, गार्डन, पोलीस स्टेशन नाही. साधं शौचालय देखील नाही. आमदार झाल्यापासून आपण या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासन आणि शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिवा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम रखडलं आहे. त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचं काम सुरू करण्यात आले होते.
राहती घरे, व्यवसायिक गाळे तोडण्यात आले. ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आला. ते लोक रस्त्यावर आले. ठाणे महानगरपालिका हम करे सो कायदा या भूमिकेत आहे. त्यांना कुणाचं काही पडलं नाही. आता हा उड्डाणपूल असाच लटकलेला आहे. हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे दिव्याचा रेल्वे फाटक बंद होणार आहे. थेट खरेदीने भूसंपादन करा आणि शेतकऱ्यांना मोबदला द्या आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. अन्यथा दहा वर्षे हा पूल काही होणार नाही असंही ते आवर्जून म्हणाले.
दिव्याचा सिंगापूर होणार, पण कधी?
महापालिकेकडून जाहिरातबाजी करण्यात आली होती की दिव्याचं सिंगापूर केलं जाईल. परंतु क्लस्टरचा इथे काहीच पत्ता नसून त्यात अजून अनधिकृत बांधकामही सुरू आहे. दिवा शहरांमध्ये करोडोची कामे झाली की भ्रष्टाचार झाला याचा ऑडिट झालं पाहिजे अशी आग्रही मागणी राजू पाटील यांनी केली.
अधिकाऱ्यांची हप्तेबाजी
दिवा रेल्वे स्टेशनची परिस्थिती अत्यंत खराब आहे. तिथे चालायला जागा नाही. फेरीवाले ,रिक्षा त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था स्टेशन परिसरात आहे . इथल्या फेरीवाल्यांनी वार्ड ऑफिसरला सुद्धा मारहाण केली होती. इथले वार्ड अधिकारी फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांकडून हप्ते गोळा करतात असा आरोप देखील पाटील यांनी केला. यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे नालेसफाईचं ऑडिट करणे देखील गरजेचे आहे या मुद्द्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं.