राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर
By पंकज पाटील | Published: December 9, 2022 06:20 PM2022-12-09T18:20:05+5:302022-12-09T18:22:11+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद
पंकज पाटील, अंबरनाथ: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे विधान केले होते त्या विधानाबाबत राज्यपालांनी योग्य वेळी योग्य खुलासा केला असता तर वातावरण शमले असते, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
अंबरनाथ येथे उभारण्यात आलेला साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत विचारणा केले असता दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण करणे गरजेचे होते. या आधी देखील त्यांच्याकडून अनेक विधाने केली गेली होती त्यावरून देखील वादंग निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळी योग्य खुलासा करून प्रकरण मिटवले होते. मात्र छत्रपतींच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत अद्याप त्यांनी योग्य खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर कायम आहे.
राज्यपालांच्या विधानाबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत त्यांना विचारले असता, आधीच्या सरकारने सीमेवरील गावांना सुविधा देणे बंद केले होते. आमच्या सरकारने त्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारचा विरोध हा होणारच होता. मात्र या प्रकरणात राजकारण न करता सीमावाद कसा मिटेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. चौकट: अंबरनाथच्या कार्यक्रमाच्या आधी केसरकर यांनी बदलापुरातील शिवभक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेतले.