अग्निशमन जवानांमुळेच आपली राख होण्याची वाचली - ज्येष्ठ साहित्यिक दीपक करंजीकर
By सचिन सागरे | Published: June 23, 2024 04:05 PM2024-06-23T16:05:43+5:302024-06-23T16:05:57+5:30
ज्येष्ठ कथाकार भिकू बारस्कर लिखित ‘ध्येयपूर्ती’ पुस्तकाचे प्रकाशन
कल्याण : अग्निशमन जवान अग्नीला सामोरे जातात ते काही कोणत्याही सन्मान किंवा पुरस्काराच्या अपेक्षेने कार्य करीत नाहीत. परमेश्वर संकटात उभा राहतो. तर जवान परमेश्वराच्या रुपात आपला आगीपासून बचाव करतात. या जवानांमुळेच आपली राख होण्याची वाचली आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक दीपक करंजीकर यांनी सार्वजनिक वाचनालय, कल्याणचे सरचिटणीस ज्येष्ठ कथाकार भिकू बारस्कर लिखित सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांची ‘ध्येयपूर्ती’ संघर्षमय जीवनगाथा या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष वेगवेगळ्या माध्यमातून येत असतो. तुरुंगातील कैद्याच्याही मागे त्यांचा अकल्पित भूतकाळ दडलेला असतो. परंतु, माणसाने ध्येयवादी असावं. ध्येयासाठी झगडणाऱ्या माणसाचं प्रेरणादायी दर्शन ‘ध्येयपूर्ती’ या पुस्तकातून घडते. समाजप्रती कर्तव्य बजावताना सेवाभाव व सहकार्याची भावना प्रत्येक गणवेशाच्या मागे दडलेली असते असे मत आधारवाडी जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. भोसले यांनी मांडले. ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कथाकार भिकू बारस्कर यांनी अग्निशमन विभागातील विविध किस्से अनुभव कथन केले. ध्येयपूर्ती पुस्तकाच्या माध्यमातून जीवघेणा संघर्ष, सामाजिक बांधिलकी, मैत्री, सुरक्षितता अशा विविध भावनांचे दाखले दिले. प्रत्यक्षात स्वतः या क्षेत्रात कार्य केल्यामुळे प्रसंगांना वास्तवतेची स्पर्श त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला.
रंगकर्मी शिवाजी शिंदे यांनी पोवाडा सादर केला. कार्यक्रम प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, विश्वस्त सुरेश पटवर्धन, प्रशांत मुल्हेरकर, माधव डोळे, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, साहित्यिक किरण येले, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष चांगदेव काळे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक, रंगकर्मी सुधीर चित्ते, गजानन कराळे, सुधाकर वसईकर, प्रसिद्ध दिग्दर्शक मंगेश सातपुते, वाचकवर्ग व ग्रंथसेविका उपस्थित होते.
अग्नी व अग्निशमन दल यांचा घनिष्ट संबंध असल्याने प्रत्यक्षात अग्निदेवतेच्या रुपात अत्यंत नाविन्यपूर्ण व दिमाखदार पद्धतीने ध्येयपूर्ती पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात संपन्न झाला.अग्निदेवतेची प्रतिमा वैष्णवी प्रशांत कल्याणकर हीने साकार केली. वाचनालयाचे चिटणीस माधव डोळे यांनी काव्यात्मक शैलीत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.