"कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 01:53 AM2021-02-07T01:53:58+5:302021-02-07T01:55:14+5:30
कल्याणमधील रिक्षाचालकाची व्यथा; कमाई घटल्याने घरखर्च चालविणे कठीण
कल्याण : ‘दोन वेळच्या जेवणासाठी किराणा भरणे, घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. रिक्षाव्यवसाय निम्म्यावर आला आहे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा. पैसे उसने घेऊन किती दिवस चालणार,’ अशी व्यथा कल्याणमधील रिक्षाचालक पुरुषोत्तम सोनवणे यांनी मांडली आहे.
सोनवणे यांनी सांगितलेली व्यथा ही त्यांच्या एकट्याचीच नाही. तर अन्य रिक्षाचालकही हीच गोष्ट सांगत आहेत. कोरोना काळात मार्च ते जूनदरम्यान रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालक घरीच होते. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यासाठी नियमावली होती. दोन प्रवासी घेऊन जाताना भाड्यासाठी कसरत करावी लागत होती. मुलांचे शिक्षण कोरोना काळात ऑनलाइनद्वारे होते. आता शाळा सुरू झाल्याने मुलांची फी भरण्यासाठी शाळांकडून विचारणा केली जात आहे. त्यातच विजेचे वाढीव बिल आले आहे. ते कुठून भरायचे, असा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
अनलॉकमध्ये रिक्षा चालविणे जिकिरीचे होते. त्यानंतर आता लोकलसेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना अपेक्षित प्रवासी भाडी मिळत नाहीत. त्यामुळे एक तास रिक्षाच्या रांगेत उभे राहून एक भाडे मिळते. रात्री ९ नंतर तर भाडे मिळत नाही. दुपारी घरी जेवायला जावे, तर आर्थिक विवंचनेमुळे भाकरीचा घास गळ्याच्या खाली उतरत नाही. पैसा कुठून आणायचा. कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते. ही विवंचना संपली असती, असे सांगताना सोनवणे यांच्या डोळ्यात पाणी आले.
‘मदतीचा हात द्या’
रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी लोकल सेवेचे वेळापत्रक बदलले जावे. तसेच रिक्षाचालकांना सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. रिक्षाचालकांच्या कल्याणकारी योजनेसाठी जो निधी ठेवला होता, तो खर्च केला पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.