कल्याण जिल्हाध्यक्षपदाची धुरा जगन्नाथ शिंदे यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:12 AM2020-11-26T01:12:28+5:302020-11-26T01:12:54+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : कार्याध्यक्षपदी वंडार पाटील
कल्याण : मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याकल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. वंडार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते बुधवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
एकेकाळी केडीएमसीत सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीचे २०१५ मध्ये दोन नगरसेवक निवडून आले होते. मनपा निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाला असतानाही त्यातून पाच वर्षांत पक्षाने कोणताच धडा घेतलेला नव्हता. स्थानिक पातळीवर पक्षाची अधोगती व आगामी केडीएमसीची निवडणूक पाहता सक्षम चेहरा जिल्हाध्यक्षपदासाठी दिला जाईल, असे संकेत होते. दिवाळीपूर्वी कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षक म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या बैठकांमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नावाला पसंती मिळाली होती. यासंदर्भात टोपे यांना मेळाव्यात निवेदनेही देण्यात आली होती.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत
nशिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. आठ वेळा ते राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचेही ते १८ वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत.
n२०१४-२०२० दरम्यान त्यांनी विधान परिषदेची आमदारकी भूषविली आहे. तर, २००५ मध्ये शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाचा महापौर पहिल्यांदा केडीएमसीत विराजमान झाला होता. तर, डॉ. पाटील यांनी
एपीएमसीचे सभापतीपद भूषविले आहे.
पक्ष संघटना मजबुतीवर भर
केडीएमसीची निवडणूक पाहता पक्ष संघटना मजबूत करणे, याला प्राधान्य असणार आहे. मनपाकडून समस्या सोडविल्या जातात का, याकडेही लक्ष राहणार आहे. कोरोनाचा काळ पाहता गरिबांना वैद्यकीय सेवा कशी मिळेल, यासाठीही विशेष प्रयत्न राहील, असे शिंदे म्हणाले. तर, जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नव्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली जाईल, असे पाटील म्हणाले.