टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का? जागरुक नागरीक फाऊंडेशनचा सवाल
By मुरलीधर भवार | Published: December 2, 2022 07:22 PM2022-12-02T19:22:49+5:302022-12-02T19:23:12+5:30
टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालकीचा ३८ एकर आरक्षित भूखंड हा साथरोग नियंत्रण रुग्णालय आणि मेडीकल कॉलेजसाठी आहे. या भूखंडावर महापालिका प्रशासनाने पाणी सोडले आहे का असा संतप्त सवाल जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. जागरुक नागरीक फाऊंडेशन येत्या ५ डिसेंबरपासून विविध मागण्यासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण महापालिका मुख्यालयासमोर करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की, सेवा नाही तर कर भरणार नाही असे आंदोलन जागरुक नागरीकतर्फे चालविले गेले. विविध १८ मागण्याकरीता मे २०१८ मध्ये उपोषण केले गेले. त्यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने पाच दिवसानंतर उपोषण मागे घेतले गेले. मात्र आजपर्यंत या १८ मागण्यांची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही. मध्यंतरी कोरोना महामारी होती. कोरोना हा साथीचा रोग होता. त्यावेळी महापालिकेकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्याचवेळी टिटवाळा येथील आरक्षीत ३८ एकर भूखंड हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजकरीता आहे. २०१८ साली ही मागणी करण्यात आली होती. कोरोना आला गेला तरी त्याठिकाणी साथरोग नियंत्रण रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारण्यात प्रशासनाकडून काही एक हालचाली नाहीत. त्यामुळे हा भूखंड भूमाफिया आणि अतिक्रमण करणा:यांकरीता मोकळा सोडून त्यावर महापालिकेने पाणी सोडले आहे का असा संतप्त सवाल घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर महापालिकेने बिल्डरांकरीता ओपन लॅण्ड टॅक्सच्या दर कमी केले. मात्र सामन्यांचा मालमत्ता करात दर कमी केले नाहीत. शहरातील कचरा समस्या कायम आहे. वर्गीकरण केले जात नाही. प्रक्रिया योग्य प्रकारे केली जात नाही. रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी वाटपाचा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेने टीडीआर दिलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीतील ६८ हजार बेकायदा बांधकाम प्रकरणातील ७२ दोषींच्या विरोधात कारवाई केलेली नाही. या सगळया प्रश्नांवर ५ डिसेंबर रोजी जागरुक नागरीकतर्फे बेमुदत उपोषण केले जाणार आहे.