कल्याण रेल्वे स्थानकात हरवलेली दागिन्यांची बॅग; अवघ्या अर्ध्यातासात पोलिसांनी लावला शोध
By मुरलीधर भवार | Published: June 24, 2024 05:41 PM2024-06-24T17:41:58+5:302024-06-24T17:43:52+5:30
तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती.
मुरलीधर भवार,कल्याण: तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती. कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून पुन्हा त्यांना परत केली आहे.
डोंबिवली आजदेपाडा येथे राहणाऱ्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे आर्मी ऑफिसर मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या त्यांचे पती जम्मू येथे कर्तव्यावर आहेत. डोंबिवलीलतील माहेरी परतण्यासाठी काल सायंकाळी त्या अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता नाशिकहून तपोवन एक्सप्रेस रेल्वेने निघाल्या. त्या कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९;३० च्या सुमारास उतरल्या. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. एका बॅगेमध्ये दागिने होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवली जाण्यासाठी गाडी पकडली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांची एक बॅग दिसत नाही. ती कुठे विसरलो. हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला फोनवरुन सांगितला. त्यांनी धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. धनश्री यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना फलट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती फौजदार रोशनी तिरोले यांना फोनद्वारे कळून त्याचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवले. याच दरम्यान धनश्री तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांना त्यांची हरवलेली दागिन्याची बॅग परत करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासातच बॅग परत मिळाल्याने धनश्री यांनी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत.