Jitendra Awhad: मी काही ज्योतिषी नाही, त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 03:39 PM2022-02-12T15:39:04+5:302022-02-12T15:41:26+5:30
Jitendra Awhad: कल्याण डोंबिवलीचा विकास झाला आहे का या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, कल्याण डोंबिवलीचा विकास हरविला आहे. मला तरी दिसला नाही.
ठाणे - कल्याण-आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागा असे आवाहन आव्हाड यांनी यावेळी केले.
कल्याण डोंबिवलीचा विकास झाला आहे का या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, कल्याण डोंबिवलीचा विकास हरविला आहे. मला तरी दिसला नाही. भाजपचे विकास म्हात्रेंचे घर सोडून बाकी कुठेही विकास झालेला नाही, अशी टिका केली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. एमआयडीतील कारखाने स्थलांतरी झाल्याने कामगारांचा रोजगार जाणार असल्यास त्याला माझा विरोध असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
माजी शिवसेना आमदारासोबत गुप्त बैठक झाली याविषयी विचारणा केली असता, त्यावर आव्हाड म्हणाले की, माझे नाव जितेंद्र आव्हाड आहे. बंद खोलीत कडी लावून कोणतीही चर्चा करीत नाही. मी भोईर यांच्या घरी गणेश दर्शनाकरीता गेलो होतो. जे काही करतो ते उघडपणे करतो. शेतकरी मारहाण प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता हे राजू पाटील यांना विचारा.
हिजाबच्या मुद्द्यावर मत
हिजाबच्या मुद्यावर बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, कोणी काय पेहराव घालावा हे तुम्ही ठरविणारे कोण असा सवाल उपस्थित करीत केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनर हा मंत्री नेमावा. त्यानंतर हे प्रश्न सूट शकतात, अशी टिकाही भाजपप्रणित केंद्र सरकारवर केली.