मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफसह संयुक्त मॉक ड्रिल
By अनिकेत घमंडी | Published: April 22, 2023 05:28 PM2023-04-22T17:28:57+5:302023-04-22T17:29:44+5:30
बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली.
डोंबिवली: मुंबई विभाग, मध्य रेल्वे दरवर्षी मोठ्या अपघाताच्या वेळी सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) सोबत संयुक्त कवायत करते. या संदर्भात दि.२२.४.२०२३ रोजी इगतपुरी अप यार्ड येथे संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. एक कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार केली गेली ज्यामध्ये, एक डबा पेटवून दिला गेला आणि रुळावरून घसरवला. बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली.
सकाळी ११.२७ वाजता ड्रिल सुरू करण्यात आली आणि लगेचच कोचला आग लागली. ११.२८ वाजता मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षातील क्षेत्रीय कर्मचार्यांकडून संदेश देण्यात आला. नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित झाले आणि राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF), रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला. राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) ११.३६ वाजता पोहोचले. घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. कोच वरून आणि खिडक्यावरून कट करण्यात आले. राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे जवान प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कोचमध्ये घुसले.
आग विझवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिका ११.४८ वाजता घटनास्थळी आणि अग्निशमन दल ११.३५ वाजता पोहोचले. रेल्वेच्या आरपीएफने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश करून आग पूर्णपणे विझवली. सर्व प्रवाशांना १२.४० वाजता बाहेर काढण्यात आले, जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. सर्व स्टेकहोल्डर्स प्रतिसादात्मक आणि जलद असल्याचे आढळले आणि संपूर्ण परिस्थिती १ तासात नियंत्रित करण्यात आली. या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले आणि वास्तविक जीवनात अशा प्रात्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात मदत होईल.
मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघात आणि अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्याचे आहे. अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले. यावेळी एम एल विष्णोई, एडीआरएम (परीचालन), लाल कुमार के, वरीष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, मुंबई विभाग; आदिश पठानिया, वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक (समन्वय), मुंबई विभाग; डॉ. रजनीश कुमार, सहायक मुख्य चिकित्सा अधिक्षक, इगतपुरी; जी.बी.गजभिये, वरिष्ठ विभागीय मॅकेनिकल इंजीनियर/फ्रेट तथा परीचालन उपस्थित होते. डॉ.ए.के.सिंग, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मुख्यालय यांनी कोणत्याही अफवा आणि चुकीची माहिती टाळण्यासाठी मीडिया एजन्सींशी समन्वय साधला.