शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट! उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत

By अनिकेत घमंडी | Published: May 6, 2024 05:48 PM2024-05-06T17:48:12+5:302024-05-06T17:49:12+5:30

वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

journey of shilphata is now even smoother three more ways of the flyover are in service | शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट! उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत

शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट! उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत

अनिकेत घमंडी, डोंबिवली :  ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. 

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या, ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे. 

शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये :

- एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.
-  ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे.
- या पुलामुळे शिळफाट्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागली आहे.

 

Web Title: journey of shilphata is now even smoother three more ways of the flyover are in service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.