सेना-भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलावर अवघ्या ४८ तासात पडला खड्डा, महापालिका, शिवसेनेची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:10 PM2021-09-09T18:10:00+5:302021-09-09T18:11:21+5:30
KDMC News: शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला
डोंबिवली - शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला असून त्याचे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल केले. अल्पवधीतच शेकडो नागरिकांनी उपहासाने महापालिकेचे अभिनंदन करून त्या खड्ड्याचे चला पहिला खड्डा पडला असे म्हणत टीकास्त्र केले. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी पुलावर गेले आणि अवघ्या काही तासातच त्यांनी तात्पुरता खड्डा बुजवण्याचा।केविलवाणा प्रयत्न केला.
हा पूल सुरू होण्याची डोंबिवलीकर आतुरतेने वाट पहात होता. मंगळवारी पुलाचे उदघाटन झाल्यानंतर वाहनचालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र पूल सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच पुलावर खड्डे पडले आहेत. यावरून आता गाजावाजा करीत उदघाटन करणाऱ्या महापालिका प्रशासनाला व सत्ताधारी शिवसेनेला नागरिकांनी ट्रोल केले. त्या खड्ड्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल करीत, पुलाचे व्हिडीओ व्हायरल करीत महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मनसेने सोडली नाही संधी
खड्डा पडल्याचे समजताच मनसे आमदार राजू पाटील व कार्यकर्ते पुलाच्या पाहणीसाठी आले. आमदार पुलावर पोहोचण्याआधीच पालिका अधिकाऱ्यांनी खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर जी तत्परता हा खड्डा भरण्यास प्रशासनाने दाखवली, तेवढीच तत्परता शहरातील इतर खड्डे भरण्यात दाखवावी. खड्डे भरण्यासाठी १७ कोटीचा निधी आहे त्याचा वापर करावा आणि चांगले रस्ते नागरिकांना द्यावेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली. चांगल्या कामाला कसे गालबोट लावायचे हे काही पक्षांचे काम आहे. ते केवळ पाहणीच करू शकतात, विधायक कामे करू शकत नाहीत असा प्रति टोला शिवसेनेने मनसेला लगावला. पुलावरील जॉईंट हे काँक्रीट चे आहेत त्यावरील डांबर निघाले होते. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम शिल्लक असल्याचे कारण सांगत शिवसेनेने सारवासारव करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
त्या पुलावरील डांबरीकरणामध्ये मास्टीक अस्फाल्टचा अंतर्भाव असतो. परंतू मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी कडक उन्हाची आवश्यक असते. गणेशोत्सवापूर्वी सदर पूल वाहतूकीस सूरु करण्यात यावा आणि नागरिकांना सुविधा देण्यात यावी या हेतूने मास्टीक अस्फाल्टचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आणि अस्फाल्टींग बिटूमनचा एक थर देऊन उड्डणपूल वाहतूकीस सुरु करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते।देत होते.
ते काम करताना मोठया प्रमाणात पर्जन्य वृष्टी होत होती त्यामुळे कोपर पूलावर काही ठिकाणी खड्डे पडणे अपेक्षित होते. गुरुवारी पडलेला खड्डा हा रेल्वेच्या एक्स्पाशन जॉइंटच्या बाजूला आहे. तो तातडीने भरुन घेतला असून वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. दस-यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावर कडक उन्हात मास्टीक अस्फाल्टचे काम सुरु करण्यात येणार आहे. - सपना देवनपल्ली कोळी, शहर अभियंता, केडीएमसी