नव्या नवरीचा साज बाजूला ठेवत एसटीचा पाना हाती घेणारी पहिली ‘कल्पना’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:09 AM2023-10-18T09:09:58+5:302023-10-18T09:10:44+5:30

बदलापूर येथे राहणाऱ्या कल्पना यांनी १९९७ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, अंबरनाथ येथील आयटीआय येथून दोन वर्षांचा रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनरचा कोर्स पूर्ण केला.

Kalpana, the mechanic of ST, leaving aside the attire of the newly married | नव्या नवरीचा साज बाजूला ठेवत एसटीचा पाना हाती घेणारी पहिली ‘कल्पना’

नव्या नवरीचा साज बाजूला ठेवत एसटीचा पाना हाती घेणारी पहिली ‘कल्पना’

- सचिन सागरे

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : हातातील हिरवा चुडा उतरत नाही तोच जिद्द, मेहनत आणि चिकाटी याचा मेळ घालत राज्य परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगारातील तांत्रिक विभागाची जबाबदारी सांभाळण्याचा योग साधला आणि सहायक मेकॅनिक पदावर काम करण्यास सुरुवात झाली. नव्या नवरीचा साज दूर ठेवत जबाबदारीला प्राधान्य देत पुरुषांच्या खांद्याला 
खांदा लावून कल्पना हेमंत निकम हे अवजड काम गेल्या १६ वर्षांपासून अविरतपणे करीत आहेत. एसटी विभागात कारागीर (क) पदावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान कल्पना यांना मिळाला आहे.

बदलापूर येथे राहणाऱ्या कल्पना यांनी १९९७ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, अंबरनाथ येथील आयटीआय येथून दोन वर्षांचा रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनरचा कोर्स पूर्ण केला. नंतर वेगवेगळी कामे करताना २००२ मध्ये  एसटी महामंडळाचा कॉल आला. मुलाखत आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये विठ्ठलवाडी एसटी आगारामध्ये सहायक मेकॅनिक पदावर रुजू झाल्या. ज्या महिन्यात लग्न झाले त्याच महिन्यात त्यांना कामावर रुजू व्हावे लागले. 

२०२२ मध्ये त्यांनी कारागीर (क) या पदावर काम केले. या ठिकाणी इंजिन सेक्शन सांभाळण्याबरोबरच आरटीओ पासिंगची कामे केली. दोन महिन्यांपूर्वी कल्याण आगारात त्यांची बदली झाली. हे काम करीत असताना अवजड वाहन चालविण्याचा परवानाही त्यांनी मिळविला. चालकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्या स्वतः एसटी चालवतात. 

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

विमान चालविण्याचे स्वप्न
क्रिकेट, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, खो-खो, कबड्डी या खेळांत प्रावीण्य मिळवले असून याच खेळांच्या जोरावर हे शिवधनुष्य लीलया पेलत असल्याचे कल्पना यांनी सांगितले. एसटी बससह विविध प्रकारची वाहने, तसेच जहाज चालवणाऱ्या कल्पना यांनी विमान चालविण्याचे स्वप्न असल्याचे आवर्जून सांगितले

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवातीला कुटुंबाचा विरोध होता; पण हळूहळू त्यांचा विरोध मावळला. वडील वरळी येथील एका कंपनीत हाय स्टील मेकॅनिक असल्याने सुरुवातीपासूनच त्याचे सहकार्य मिळाले. त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली. 
- कल्पना निकम, 
कल्याण एसटी आगार

Web Title: Kalpana, the mechanic of ST, leaving aside the attire of the newly married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.